Video: हे वेस्ट इंडीजवाले पण ना काय करतील याचा काय नेम नाही! विकेट घेतल्यानंतर थेट ‘बॅट्समन’च्याच उरावर जाऊन बसला ख्रिस गेल

0

दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकाचा ३८वा सामना आज वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये (AUSvWI) खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने वेस्टइंडीज संघाचा सहज पराभव करत या विश्वचषकाच्या सेमी फायनलमधली(semi final) आपली दावेदारी भक्कम केली आहे. वेस्ट इंडीज संघाने दिलेले १५७ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात १६.२ षटकात सहज पूर्ण केले.

गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची(David Warner) बॅट आज महत्त्वपूर्ण सामन्यात तळपल्याची पाहायला मिळाली. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला एकहाती सामना जिंकून देताना ५६ चेंडूत ८९ धावांची नाबाद वादळी खेळी केली. डेव्हिड वॉर्नरला तीन नंबरला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मिचेल मार्शने (Mitchell Marsh) चांगली साथ दिली. अॉस्ट्रेलियाला विजयासाठी एका धावेची आवश्यकता असताना मिचेल मार्श गेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

ख्रिस गेलने (Chris Gayle) आपला हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याचे संकेत दिले असल्याचे दिसून आले आहे. युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अधिकृत निवृत्ती जाहीर केली नसली तरी, हा त्याचा कदाचित शेवटचा सामना असल्याचं देखील बोललं जात आहे. आपल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर त्याला मिळालेली विकेट हा त्याच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण ठरला. ख्रीस गेलने आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मिचेल मार्शला झेलबाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवट गोड केला. मात्र ख्रिस गेलने मिचेल मार्शची विकेट घेतल्यानंतर केलेला आनंदोत्सव सध्या सोशल मीडियावर तुफान धिंगाणा घालताना पाहायला मिळत आहे.

त्याचं झालं असं, मिचेल मार्शला ख्रिस गेलने झेलबाद केल्यानंतर ख्रिस गेल धावत धावत मिचेल मार्शच्या जवळ गेला, आणि त्याने थेट मार्शच्या खांद्यावरच उडी मारली. मिचेल मार्श देखील त्याला दाद देत त्याच्या आनंदोत्सवात सामील झाला. मॅच नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असून, अनेकांनी ख्रिस गेल आणि मिचेल मार्शचे देखील कौतुक केले आहे. विंडीजचे खेळाडू आपल्या सेलिब्रेशनमुळे नेहमीच चर्चेत असतात. फक्त चर्चेतच नाही तर त्यांच्या सेलिब्रेशनची अनेकांना भूरळ पडत असते.

दुबईमध्ये सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचा प्रमुख दावेदार म्हणून वेस्टइंडीज संघाकडे पाहिलं जात होतं, मात्र भारताप्रमाणेच त्यांनीदेखील यावेळेस खराब प्रदर्शन करत चाहत्यांची मनं दुखावली. टी-ट्वेंटीचे बादशहा म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. मात्र या स्पर्धेत सुरुवात खराब झाली आणि त्यानंतर ते या विश्वचषकात पुन्हा उभारी घेऊ शकले नाहीत. आता अधिकृतरित्या या विश्वचषकातून त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला देखील सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (South Africav England) यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.