Sameer wankhede: समीर वानखेडेंचा वाईट काळ सुरू; आर्यन खान ड्रग्स प्रकरणासह ‘या’ महत्वपूर्ण सहा चौकशातून हकालपट्टी

0

आर्यन खान ड्रग्स प्रकरणातून संपूर्ण जगाला आपली ओळख करून देणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा (Aryan Khan Drug case) स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने धक्कादायक आरोप केल्यानंतर समीर वानखडे यापूर्वीही अडचणीत आले होते. या प्रकरणात आठ कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा धक्कादायक खुलासा प्रभाकर साईलने केल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आता पुन्हा एकदा एनसीबीने समीर वानखेडे (Sameer wankhede) यांना धक्का दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

दोन ऑक्‍टोबरला कार्डिलिया क्रुझवर एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांनी छापा टाकत, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखडे हे हिरो म्हणून समोर आले. मात्र या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाऊ लागला तसतशी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) रोज नवनवीन खुलासे करत समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत आहेत. तर दुसरीकडे आता, काल भीम आर्मी संघटनेने देखील समीर वानखेडे यांच्या विरोधात जात पडताळणी समितीमार्फत त्यांच्या कागदपत्रांची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी ‘एससी’ असल्याचं खोटं सांगत, खोटी कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवली. असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी जात प्रमाणपत्र देखील आपल्या ट्विटरवरून शेअर केला होतं. आता या प्रकरणात भीम आर्मी संघटनेने उडी घेतली असल्याने समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भीम आर्मी नंतर आज पुन्हा समीर वानखेडे यांच्यासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा तपास आता काढून घेतल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. फक्त आर्यन खानच नाही तर, आर्यन खान बरोबर आणखी पाच प्रकरणाचाही तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला असल्याचं, नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितलं आहे. समीर वानखेडेंसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरून समीर वानखेडे यांना टार्गेट करत म्हटलं आहे,ही तर फक्त सुरुवात आहे.

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे, आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी झाली आहे. फक्त पाच नाही तर एकूण २६ प्रकरणे तपासण्याची गरज आहे. त्याचबरोबर नवाब मलिक यांनी ही फक्त सुरुवात आहे, ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असा इशारा देखील त्यांनी समीर वानखेडे यांना अप्रत्यक्ष दिला आहे. आता या सर्व प्रकारानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.