मलाच आता कळेना झालंय, राज्यात सुरू असलेलं राजकारण म्हणजे…!” : उदयनराजे

राज्यामध्ये  वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये सतत  आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यात मनसुख हिरेन, अँटिलिया बॉम्ब प्रकरण, परमबीर सिंह यांचं पत्र त्यापाठोपाठ आता सचिन वाझे यांचं पत्र यावरून महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच घुसळण पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणावर  आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्याच राजकारण नेमक   कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झाले आहे. राज्यामध्ये सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे”, अशी प्रतिक्रिया  खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली  आहे. राज्यातील वेगवेगळ्या  घडामोडींचा, करोनाचा आणि राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनचा यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला.

सातारा येथे पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे म्हणाले,”गो करोना गो करोना असे म्हणून करोना जाणार नाही. त्यामुळे शासनाने लावलेल्या निर्बंधांबाबत योग्य तो पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्य  लोकांना जगणे कठीण होणार नाही याची दखल  सरकारने घ्यावी. राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांना सुध्दा कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे तेदेखील कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. आरोग्य महत्वाचे आहेच परंतु  खाण्याचे काय?  हा विचार देखील सरकारने करावा. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत. जगाच्या पोटात कोरोणा संसर्गामुळे भीतीचा गोळा निर्माण केला आहे. या आजाराच्या  भितीपोटी लाखो लोकांना हृदयविकाराचे झटके आले. त्यामुळे लोकांनी न भिता संसर्गाचा सामना करावा”, असे आव्हान उदयनराजे भोसले यांनी केले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.