‘भाजपच्या कृतीला सांगलीतून प्रत्युत्तर’: शरद पवार साहेब

भारतीय जनता पार्टीने लोकमताचा अनादर करीत काही राज्यांतील सत्ता हस्तगत केली, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात सांगलीमधून झाली. ही  घटना चांगली  आहे. आता सर्वांना सोबत  घेउन विकासाची कामे मार्गी लावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी दिला.

सांगली महापालिकेमध्ये बहुमत असूनसुध्दा भाजप उमेदवारांचा पराभव करीत काँग्रेसच्या मदतीने सत्तांतर घडवून आणल्यानंतर सांगलीचे नवनिर्वाचित महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासोबत शनिवारी पवार यांची बारामती येथे भेट घेतली.

या भेटी दरम्यान   पवार साहेबांनी सत्तांतरावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीची माहिती विचारून घेतली. महापौर निवडीवेळी किती सदस्यांनी आघाडीला मतदान केले, तर किती गैरहजर राहिले याची देखील  विचारणा पवारांनी केली. आघाडीला मदत करणाऱ्या लोकांना विकासकामे करत  असताना विश्वाासात घ्या, असा सल्लाही त्यांनी या  वेळी दिला.

भारतीय जनता पार्टीने  ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर हल्ले करीत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले, त्यांना चोख प्रत्युत्तर सांगलीतून मिळाले आहेत.  ही सुरुवात आहे, असेही त्यांनी  सांगितले. या भेटी दरम्यान  बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे याही उपस्थित होत्या.

या भेटीदरम्यान सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यादेखील उपस्थित होत्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.