माळशिरस तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या ‘पिंपरी’ ग्रामपंचायतीचे ‘सरपंचपद’ सर्वसाधारण महिलाकडे!
माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर बहुप्रतिक्षित असणारे सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर झाले. यामध्ये अनेकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे,तर काहींची लॉटरी लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
यापूर्वीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये,निवडणूक लागण्यापूर्वीच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केलं जायचं. या निर्णयामुळे अनेक गावांमध्ये सरपंच पदाच्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या. सरपंच पदाच्या खुर्च्या रिकाम्या राहिल्याने उपसरपंचच ‘सरपंच’ पदाचा कारभार पाहू लागला. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्याने यावेळेस निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येनुसारच आरक्षणाची सोडत जाहीर करणार असल्याचं सांगितलं. ग्रामपंचायतमध्ये कोणत्या कॅटेगिरीच्या सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे, त्या संदर्भानुसारच आरक्षणाची सोडत जाहीर केली असल्याचे बोलले जात आहे.
माळशिरस तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या पिंपरी गावाच्या सरपंच पदाचे आरक्षण देखील याच निकषाने जाहीर करण्यात आले आहे. पिंपरी ग्रामपंचायत सदस्यांची एकूण संख्या 11 आहे,त्यापैकी सहा महिला तर पाच पुरुषांचा समावेश आहे. सहा महिलांमध्ये चार सर्वसाधारण महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक चार सर्वसाधारण महिला असल्यामुळे पिंपरी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला असणार असल्याचे शिक्कामोर्तब झालं आहे.
पिंपरी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असल्यामुळे, पुरुषांच्या उमेदवारीसाठी अडून बसणाऱ्यांंसाठी ही खूप मोठी चपराक बसली असल्याचं गावात बोललं जातंय. पॅनल प्रमुख हे नेहमी पुरुष उमेदवारीवर ठाम असतात, साधारण असंच चित्र प्रत्येक गावात पाहायला मिळतं. पिंपरी गावामध्ये देखील हीच परिस्थिती होती,असं गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतायत. गावाचे सरपंच पद मलाच पाहिजे,अशी भूमिका असणाऱ्या महत्त्वकांक्षी लोकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे खूप मोठी चपराक आहे,असं गावातील तरुणांच म्हणणं आहे.
पिंपरी गावातील सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलांना आरक्षित असल्याने, आता कोणाकडे किती वर्षे सरपंच पद असणार आहे? हे पाहणं येणाऱ्या काळात खूप उत्सुकतेचे ठरणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.