चंद्रकांत पाटील यांचे अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर




भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्या कालच्या कोल्हापूरला परतण्याच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. “मी कोल्हापूरला परत जाणार या माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरून जाऊ नये. माझं जे मिशन आहे ते पूर्ण झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेलाही उत्तर दिलं. अजित पवारांना काय पडलंय आमचं? त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. शरद पवारांनंतर त्यांना काय स्थान राहील ते विचारावं. मला माझा पक्ष काय म्हणतो हे महत्त्वाचे आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “माझ्या कोल्हापूरमध्ये परतण्याच्या वक्तव्याबाबत उलटसुलट चर्चा झाली.

त्यामुळेच मला आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. माझ्या त्या वक्तव्याने कुणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरुनही जाऊ नये. मला ते बोलताना इतकी चर्चा होईल असं वाटलं नाही. माझं वाक्य असं होतं की केंद्राने मला दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही. केंद्राने मला सहजासहजी असंच पुण्यात पाठवलेलं नाही.” चंद्रकांत पाटील काल काय म्हणाले होते? पुण्यात शुक्रवारी अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण झाले.

या कार्यक्रमाच्या मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, पुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे.

विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. अजित पवार आज काय म्हणाले? कोल्हापूरला परत जाईन असं म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं, असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. “एक म्हणतो पुन्हा येईन तर दुसरा म्हणतो परत जाईन, तुम्हाला बोलावलंय कुणी..??”, अशा खास पुणेरी स्टाईल कोपरखळ्या अजित पवार यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना लगावल्या होत्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.