माजी मंत्री विष्णु सवरा यांचे निधन;त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या.

भारतीय जनता पार्टीचे नेते,माजी आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सवरा यांचे  काल संध्याकाळी निधन झाले.    विष्णू सवरा यांचे वय  ७२  वर्ष  होते. गेल्या दोन     वर्षांपासून ते यकृताच्या आजाराने  ग्रस्त होते. विष्णु   सवरा यांची जागृत,कर्तव्यदक्ष अशी ओळख  होती.

राजकारणात येण्यापूर्वी विष्णू सवरा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत होते. १९८० मध्ये मोठ्या पगाराची नोकरी त्यांनी सोडली व भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. १९८० च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विष्णु सवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भारतीय जनता पार्टीने त्यांना ही संधी दिली, मात्र सवरा यांचा या निवडणुकीत  पराभव झाला. १९८५ मध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीने  सावरा यांना उमेदवारी जाहीर केली. वाडा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली मात्र सवरा यांना पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. सावरा यांचा  दोन वेळा पराभव झाल्यानंतरही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले.

भारतीय जनता पार्टीने विष्णू सावरा यांना तिसऱ्यांदा संधी दिली .सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाने वाडा मतदार संघामधून पुन्हा उमेदवारी दिली. १९९० साली झालेल्या निवडणुकीमध्ये  मात्र त्यांनी विजय प्राप्त केला. १९९० नंतर विष्णु सवरा यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सन १९९० नंतर झालेल्या  सन २०१४ पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीमध्ये  त्यांनी विजय मिळवला आहे. सवरा यांनी सतत सहावेळा विजयी होण्याचा सन्मान देखील मिळविला आहे.

१९९५ या वर्षी  युती सरकारच्या काळात त्यांना अखेरच्या  टप्प्यात १ फेब्रुवारी १९९९ रोजी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला. फक्त सहा महिने त्यांना मंत्रिपद मिळाले होते. या मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली. राज्यातील शंभर पेक्षा अधिक आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण  निर्णय त्यांनी घेतला. विक्रमगड तालुक्याची निर्मिती देखील सावरा यांनी केली. वाडा येथे २२० के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र त्यांनी उभारले. वाडा एसटी आगाराची निर्मिती केली. अनेक  पुलांची कामे त्यांनी केली. तंत्रशिक्षण केंद्र त्यांनी उभारले, अशा अनेक कामांसोबत आदिवासी भागात प्रत्येक गावाला जोडणा-या रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, समाजगृहे अशी अनेक कामे त्यांनी केली.

सन २०१४ जेव्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात आले. तेव्हा  भाजपा सरकार मध्ये त्यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री म्हणून पदभार सांभाळण्याचा त्यांना सन्मान मिळाला. मंत्री झाल्यावर त्यांनी सर्वांबरोबर अतिशय नम्रतेने वागून आपल्या स्वभावाची एक वेगळीच छाप पाडली होती. त्यांच्या स्वभावात एक सौम्यापणा होता.

लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते उत्सुक असायचे. त्यात त्यांना रस असायचा .जनतेच्या प्रश्नांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असत. शेतकऱ्यांचा कर्ज मुक्तीचा लढा असेल, दुष्काळामधील कठीण परिस्थिती असेल, कुपोषणाचा प्रश्र्न असेल, अतिवृष्टी सारखे संकट, जिल्हा विभाजनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे  त्यांचे कार्य कधीही न विसरता येणारे आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.