पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत सावित्रीबाई फुले…

0

महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी. संत विचारवंतांची भूमी… अशा या भारताच्या मातीमध्ये सोन्यासारखी माणसं जन्मली , सोन्यासारखी माणसं जन्मतात. सावित्रीबाई जोतीराव फुले त्यापैकी एक. ख-या अर्थानं शिक्षणामुळे समाजांमध्ये परिवर्तन घडून आले. आधुनिक भारताच्या जड‌णघडणीचा पाया शिक्षणामुळे रचला गेला. भारतांमध्ये शैक्षणिक व सामाजिक परिवर्तन शक्य झालं.

स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा  फुले व सावित्रीमाई फुले. सावित्रीज्योती खरंच आभाळाएवढी माणसं होती. १९ व्या शतकातील युगप्रवर्तक, महामानव, समाजसुधारक. दीपस्तंभ व्यक्तीमत्वे होती. शोषित  पिढीत, उपेक्षित,बहिष्कृत लोकांसाठी आयुष्य वेचलेलं आदर्श दांम्पत्य. शिक्षण हे एक असं साधन आहे की जे जग बदलू शकतं. मानव विकास, सामाजिक बद‌लाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार करावा लागतो. मानसिक गुलामीच्या जोखंडातून मुक्त करून आयुष्य सुखकर करण्यासाठी इतरांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणून फुलेंचा विचार करावा लागेल. आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी मजबूत पाया फुलेंनी रचला. आज स्त्रियांना स्वातंत्र्य आणि हक्क मिळत आहेत;हे सर्व शक्य झालं ते फुले दांम्पत्य आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे.

सातारा जिल्ह‌यातील नायगाव या गावी ३ जानेवारी, १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला . त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, वडिल खंडोजी नेवसे पाटील. सावित्रीबाई निरक्षर  होत्या. सावित्रीबाईंचे लग्न ज्योतिरावांशी झाले त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या. तर ज्योतिरावांचे वय त्यावेळी तेरा वर्ष होते.फुलांच्या व्यवसायावरून ज्योतिरावांचे अडनाव फुले असे पडले.

ज्योतिरावांनी सावित्रीस शिकवले. सावित्रीबाईंना अक्षरांची ओळख झाली ती ज्योतिरावामुळेच. सावित्रीबाई लिहायला, वाचायला शिकल्या.त्या काळी स्त्रियांना शिक्षणास मनाई होती. स्त्री शिकली म्हणजे वैधव्य येतं अशी ‘अंधश्रद्धा’ होती. ज्योतिरावाने सावित्रीस शिकवून समाजामध्ये क्रांती घडवून आणली. ज्योतिरावांचा त्यांच्या वडिलांशी वाद साला, परिणामतः सावित्रीबाई-ज्योतिरावांना स्वतःचं घर सोडावं लागलं.एकमेकांना खंबीरपणे साथ देत संसारा‌चा गाडा ओढत बहुजन समाजाचे पालकत्व स्विकारले, शिक्षणासाठी केलेला विद्रोह सामाजिक बद‌लांची नांदी ठरेल याची कल्पना दोघांनाही असावी. शिक्षणाशिवाय समाज जागरूक होणार नाही हे पहिल्यांदा त्यांनी जाणले. सजग समाजचं लोककल्याणासाठी उपयोगी ठरतो. शिक्षणातूनच क्रांतीची मशाल पेटली! सावित्री- ज्योतिस खंबीर साथ भेटली !!

ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी खंबीरपणे साथ दिली. आधुनिक भारताच्या शिक्षणाची पायाभरणी केली. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मानवतेच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारी सावित्रीमाय । पहिल्या स्त्री शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका, आधुनिक भारताच्या पहिल्या स्त्रीवादी विचारवंत, भारतात स्त्रीवादी चळवळीची सुरवात सावित्रीबाईंमुळेच झाली.

• स्त्रीवाद’ म्हणजे काय ? स्त्रीवाद ही सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांत स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारी प्रणाली. स्त्रीवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली असता एक गोष्ट लक्षात येते की स्वातंत्र्य, समता, नैसर्गिक अधिकार या बाबींचा समावेश स्त्रीवादाच्या मुलभूत गोष्टीमध्ये होतो. • सिमॉन-दि-बोव्हा’ या स्त्रीवादी विचारवंत , लेखिकेने असं म्हटलं आहे की, “बाई म्हणून कोणी जन्माला येत नाही. नंतर तीला बाई बनवले जाते.” बाईपणाची मूल्य देखील पुरुषप्रधान व्यवस्थाच ठरवते. म्हणूनच स्त्रीवादी विचारसरणी पुरुषसत्तांक व्यवस्थेला आव्हान देते. यावरून लक्षात येते की स्त्रीवाद ही एक व्यापक संकल्पना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंद स्त्रियांची उन्नती आणि अवनती’ या लेखात हिंदू समाजव्यवस्थेत स्त्रियांचा दर्जा कसा कनिष्ठ प्रतीचा झाला यासंबंधी विचार मांडले आहेत. त्याचबरोबर लिंगभेदाच्या असमानतेवर आधारलेल्या पुरुषप्रधान भारतीय समाजरचनेने धर्म‌शास्त्राचा, पुराणांचा, मनुस्मृतीचा दाखला देऊन स्त्रियांचे हक्क व अधिकार कसे नाकारले यासंबंधी विवेचन केले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी ‘सत्सार’, ‘अंकुर’ आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकांत स्त्री-पुरुष भेदाविषयी सखोल चर्चा केली आहे.

लिंगभेदाच्या श्रमविभागणीमुळे पुरुषांना अधिकचे अधिकार प्राप्त आले. संपत्ती व सत्तेवर पुरुषांचे वर्चस्व निर्माण साले. स्त्रीयांना दुय्यम स्थान प्राप्त झाले. मानवी जीवनाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्ष‌णिक अशा विविश्व पातळीवर असमानता होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाईंचा उदय झाला. आणि पुढे जाऊन त्या पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत म्हणून उद‌यास आल्या.स्त्रीयांच्या उद्धारकर्त्या झाल्या.

हा तो काळ होता, ज्या काळात बालविवाह, सतीप्रथा, केशवपन,पडदा पध्दती यांसारख्या अनिष्ठ चालिरिती होत्या. या अवैज्ञानिक, अमानवी रुढींना विरोध करण्याचं धाडसी पाऊल सावित्रीबाईंनी उचललं. केशवपनाच्या विरोधात महात्मा फुलेंच्या मदतीने नाभिकांचा संप घडवून आणला. जातीपातीच्या भिंती मोडण्यासाठी प्रबोधनाचं कार्य शिक्ष‌णाच्या माध्यमातून केलं. स्त्रीयांना सन्मानाने जगता यावं यासाठी संपूर्ण आयुष्यभर अविरतपणे कार्य केलं. महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह’ स्थापन केलेलं होतं.गृहातील निराधार, निराश्रीत बायकांची सेवा सावित्रीबाईंनी केली. महिला सशक्तीकरणावर प्रबळपणे कार्य केलं.  सावित्रीबाई स्त्रीवाद मांडून थांबत नाहीत तर प्रत्यक्षपणे स्त्रीयांच्या समस्येवर, प्रश्नावर कार्य करताना दिसतात. बालहत्या प्रतिबंधक गृहातील विधवा बायकांची बाळंतपणे यशस्वीपणे पार पाडली. काशीबाई नावाच्या ब्राम्हण विधवेच्या मुलास सांभाळले. त्याला दत्तक घेतले. यशवंत हे त्याचे नाव. यशवंत शिकून मोठा झाला. चांगला डॉक्टर बनला.. सावित्रीज्योती त्याचे माता पिता बनले.

१८४८ साली भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु झा‌ली. सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. अधिकृतपणे सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठीचं प्रशिक्षण घेतलं होतं.सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे घेतले होते. अधिकृत प्रशिक्षण घेतलेल्या सावित्रीबाई  फुले पहिल्या भारतीय स्त्री शिक्षकां होत्या.. मुली लिहायला, वाचायला शिकल्या. सावित्रीबाईंनी शेणाचा,दगड-गोट्यांचा मार सहन करून न डगमगता धैर्याने परिस्थितीशी तोंड दिले. स्त्रियांच्या प्रश्नांबरोबरच सामाजिक समस्येवर भाष्य करण्याच काम सावित्रीबाईंनी केले, त्यासाठी वेळप्रसंगी पाऊले उचलली. सावित्रीबाईंनी १८५२ मध्ये महिला सेवा मंडळाची स्थापना केली. सर्व जाती-धर्माच्या बायकांसाठी तिळगुळाचा, हळदीकुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्त्रीशिक्षणाबरोबरच स्त्रीयांना आत्मनिर्भर बनवण्याचे कार्य सावित्रीबाईनी केले.

२४ सप्टेंबर, १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली. सत्यशोधक समाजाच्या कार्यात सावित्रीबाईंनी महत्त्वाची भूमिका साकारली. २५ डिसेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सीताराम अल्हाट व राधाबाई निंबकर यांचा सत्यशोधक पध्दतीने विवाह केला. त्यावेळी राधाबाई निंबकर यांना वैचारिक व मानसिक आधार देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले.

१८७६च्या दुष्काळात अनाथ, अपंग, निराधार लोकांना मदत करण्यासाठी कैंप चालवला. 1890 नंतर महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची जबाबदारी सांभाळली. भयंकर संकट प्लेगच्या रुपात अवतरलं होतं यशवंत आणि सावित्रीमाई या माय-लेकाने प्लेगच्या वेळी जनतेची सेवा केली. सेवा करत असताना प्लेगचा संसर्ग होऊन 10 मार्च १८९७ साली सावित्रीबाईचं निधन झालं. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना होती. यशवंत देखील वैद्यकीय सेवा करत असताना आपले माता पिता असलेल्या सावित्रीबाईं व महात्मा फुलेंना आदर्श मानून जनसेवा करत असे. पुत्र यशवंतराव फुले प्लेगपासून त्यावेळी वाचले. त्यांनी निरंतर सेवा सुरु ठेवली. पुढं सेवा देण्यासाठी ते सैनदलात गेले. १९०५ ला परतले कारण प्लेगनं पुन्हा डोकं वर काढलं होतं. रुग्णांवर ते ही दिवस रात्र उपचार करत राहिले आणि शेवटी १३ ऑक्टोबर १९०५ ला त्यांचा मृत्यू झाला.

• मुक्ता ही सावित्रीबाईंची विद्यार्थिनी होती. तिचा परीक्षेत पहिला नंबर आला होता. कलेक्टरच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर मुक्ता नावाची विद्यार्थिनी इंग्रजी भाषेत बोलते. आणि म्हणते की, ‘आम्हांला बक्षिसे नको, ग्रंथालय पाहिजे.शाळेचं पहिलं ग्रंथालय तेथून सुरु झालं. सावित्रीबाईं व महात्मा फुलेंच्या संस्कारामुळे अनेक पिढी घडल्या आजही ते कार्य अविरतपणे सुरू आहे असं म्हटलं तर वावगे ठरू नये.

जेष्ठ संशोधक, अभ्यासक प्राध्यापक हरी नरके सर सावित्रीबाईंचा उल्लेख स्त्री हक्काच्या प्रणेत्यां असं करतात. प्रा. हरी नरके सरांच्या शब्दांत सांगायचे झालं तर ते असं म्हणतात आज जागतिक पातळीवर महिलांनी सामाजिक स्वातंत्र्य आणि शैक्षणिक सामार्थ्याच्या जोरावर वेगवान प्रगती केलेली आहे. त्यामुळे देशाच्या विकासात महिलांचे योगदान सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचं श्रेय  सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांना द्यावे लागते.

स्त्री-पुरुष समानतेच्या भाष्यकार ताराबाई शिंदे यांच्यावर सावित्रीबाईंच्या विचारांचा ; त्यांच्या कार्याचा प्रभाव होता. ताराबाई शिंदे यांनी लिहलेलं स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ स्त्रीवादाचं बायबल म्हणावं लागेल. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रीया आज देश सांभाळू लागल्या आहेत. हे शक्य झालं ते सावित्रीबाई, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या योगदानामुळे.सावित्रीबाईं स्त्री व पुरुष या दोघांना ‘माणूस’ या परिभाषेतून पाहतात. आधुनिक भारतात स्त्री-पुरुष समानतेची गुढी सावित्री जोतीरावाने उभारली. एका अशिक्षित स्त्रीने स्वतः शिक्षण घेऊन; शिक्षिका बनून स्त्रियांचा उद्‌धार करावा ही घटना जगाने दखल घ्यावी अशीच आहे.

अभ्यास करी विद्येचा, विद्येस देव मानून । विद्या हेच धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहुन ॥

भारतामध्ये स्त्रीवाद निर्माण झाला . जोतिबा-सावित्रीचे  प्रयत्न, बाबासाहेबांचे संविधान यामुळे स्त्रिया गुलामीतून मुक्त झाल्या.

सावित्रीबाई स्त्रीयांना आवाहन करतात की,

असे गर्जूनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा

परंपरेच्या बेड्या तोडूनी , शिकण्यासाठी उठा ।।

देशांत मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, फातीमा शेख, गेल ऑमव्हेट, दुर्गा भागवत, यांसारख्या अशा हजारो लाखों स्त्रीवादी महिला घडू शकल्या. सावित्रीच्या  लेकींनी आज आकाश कवेत घेतलं आहे.

अंततः सावित्री-रमा घरोघरी । जोती- भिमाचा शोध जारी ॥

पी. डी. कसबे.

(सामाजिक शास्त्राचे अभ्यासक )

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.