बलात्कार केल्यास ‘नपुसंक’ करण्याचा कायदा संसदेत मंजूर! वाचा सविस्तर!
जगभरात बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना समोर येतात. भारतात देखील हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळते. काही देशांमध्ये बलात्कार गुन्ह्यावर कठोर कारवाई करण्याचा कायदा असून देखील बलात्कार होताना दिसून येतात. भारतामध्ये बलात्कार करणाऱ्यांविरूद्ध कठोर शिक्षा असणारा कायदा करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. बलात्कार करणाऱ्यांच्या विरोधात भारतामध्ये कठोर कायदा करण्यात आला नसला तरी,आपला शेजारी,पाकिस्तानमध्ये याविषयी एक कठोर कायदा करण्यात आला आहे.
लाहोरमध्ये एका महामार्गावर आपल्या मुलांसमोरच एका महिलेवर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानमध्ये हजारोंच्या संख्येत महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला सार्वत्रिक ठिकाणी फाशी देण्यात यायला हवी, असं बोलून दाखवलं होतं.
लाहोरमध्ये घडलेल्या घटनेचे, संपूर्ण पाकिस्तानभर तीव्र पडसाद उमटल्यानंतर,बलात्कार प्रकरणा विषयी कठोर कायदा करत,पाकिस्तान सरकारने बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला नपुसंक करण्याचा कायदा संसदेत मंजूर करून राष्ट्रपतीची स्वाक्षरी घेऊन हा कायदा अमलात आणला आहे.
बलात्काराच्या कायद्याबरोबरच या कायद्यामध्ये अनेक तरतुदी देखील पाकिस्तान सरकारने केल्या आहेत. बलात्कार प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी पाकिस्तान सरकार विशेष न्यायालयाची स्थापना करणार असून या न्यायालयांना पंतप्रधान निधी सुरु करण्यात येणार आहे. नवीन कायद्यानुसार बलात्कार प्रकरणाचा निकाल चार महिन्यांमध्ये लावला जाणार असून दोषींना नपुसंक करण्यात येणार आहे.
बलात्कार प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा योग्य ती चौकशी होत नाही. आणि म्हणून जर या प्रकरणाची अधिकाऱ्यांनी,पोलीसांनी योग्य ती चौकशी केली नाही तर,अशा पोलीस अधिकाऱ्यांवर तीन वर्षांपर्यंत कारावास भोगण्याची तरतूद या नवीन कायद्यात करण्यात आली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.