तीन लाखात ‘खाकी’वर्दी; ‘असा’ झाला डमी रॅकेटचा पर्दाफाश, गृहमंत्र्यांनीही मान्य केले…
परीक्षांचा घोळ हा विद्यार्थ्यांच्या पाचवीला पुजला असल्याचं महाराष्ट्रात अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे. आरोग्य भरती आणि शिक्षक भरती परिक्षांच्या घोळानंतर आता पोलीस भरती परिक्षेतही घोळ झाल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. मात्र दुसरीकडे विद्यार्थी प्रचंड संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
१४नोव्हेंबर २०२१ ला विविध परिक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा मुंबई पोलिस दलातील एकूण १०७६ शिपाई पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातून जवळपास दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आपलं नशीब आजमावलं. मात्र मैदानी चाचणी ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती, त्या विद्यार्थ्यांच्या जागांवर लेखी परीक्षा दुसऱ्यानेच दिली, असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
संपूर्ण परीक्षेचे चित्रीकरण करण्यात आल्यामुळे, या परीक्षेचं डमी रॅकेट उघडकीस आले असून, आत्तापर्यंत तपासात एकूण आठ जणांचे डमी रॅकेट उघडकीस आले आहे. या ‘डमी रॅकेट’ पाठीमागे औरंगाबाद कनेक्शन असल्याचं तपासातून समोर येत आहे. विशेष म्हणजे पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमी आणि खाजगी क्लासेसचाच यामध्ये हात असल्याचं बोललं जातं आहे. पोलीस भरतीसाठी निवड झालेल्या १०७८ जणांची वैद्यकीय आणि कागदपत्रे पडताळणी सध्या सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीमध्ये काही घटनांमध्ये उमेदवाराने आपल्या जागी दुसऱ्या उमेदवाराला बसवून भरतीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अतिशय निंदनीय असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. #पोलीसभरती #महाराष्ट्र pic.twitter.com/4tlMwrHXXh
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) February 10, 2022
एक हजार ७६ जणांची वैद्यकीय आणि कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया सुरू असून, यामध्ये आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांचे डमी रॅकेट उघड होणार असल्याचं, सांगण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मैदानी चाचणीची तयारी करून घेणाऱ्या एका शिक्षकानेच तीन मुलांची या पोलीस भरतीत मैदानी चाचणी दिली असल्याची, धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘गणेश पवार’ असं या शिक्षकाचे नाव असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गणेश पवार या शिक्षकाने ज्या तीन विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी दिली होती, त्या तीनही मूळ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गणेश पवार या शिक्षकाने या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी तीन-तीन लाख रुपये घेतले असल्याचा खुलासा समोर आला असून,’गणेश पवार’ला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा आणखी उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण भरती प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाते, यावेळी देखील याचे चित्रीकरण करण्यात आले. आणि त्यामुळे हे रॅकेट उघड झाल्याची माहिती आहे.
१४नोव्हेंबर २०२१ ला विविध परीक्षा केंद्रांवर मुंबई पोलिस दलातील १०७६ पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षा झाल्यानंतर, सहा डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत मैदानी चाचणी प्रकिया पार पडली. या परीक्षेचा निकाल पाच जानेवारीला जाहीर करण्यात आला. यामध्ये एकूण एक हजार ७६ जणांची निवड करण्यात आली. आणि आता, निवड झालेल्या १०७६ उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणी सुरू आहे.
एक हजार ७६ जणांच्या वैद्यकीय चाचणी, कागदपत्र पडताळणी बरोबरच, संबंधित अधिकारी याच उमेदवारांनी लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा दिली आहे का? त्याबरोबरच अर्जावर यांचाच फोटो आहे का? याची पडताळणी करत आहेत. सर्व परीक्षांचे चित्रीकरण केल्याने, हे तपासणं अधिकाऱ्यांना सोपं जात आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांचे डमी रॅकेट उघड होताना पाहायला मिळत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम