पतीच्या मृत्यूनंतर आजही पत्नीला ‘रंडकी’ म्हणून जगावं लागतं; या ‘अनिष्ट’ ‘प्रथे’विरोधात सरकारने…

समाजातील विविध घटकांना या 'प्रथे'विरोधात एकत्र येण्याचे आवाहन

0

अलिकडच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं आयुष्य जगत असल्याचं पाहायला मिळतं मात्र अजूनही, आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्याचंच बोललं जातं. अजूनही पुरुषा एवढं स्वातंत्र महिलांना मिळालं नसल्याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास आपल्याला पाहायला मिळतील. महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशाच एका अनिष्ट प्रथेवर लक्ष वेधण्याचं काम महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी केले आहे.

एकेकाळी महिलांनी ‘सती’सारख्या अनिष्ट प्रथेचाही सामना केलाय. सतीच्या प्रथेविषयी आज कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ब्रिटिश सरकारने ४ डिसेंबर १८२९ ला भारतातील सतीची जुलमी प्रथा बंद करण्याचं ऐतिहासिक काम केले. लॉर्ड विलियम बेंटिंक यांनी सती बंदीचा कायदा आणत ही अनिष्ट प्रथा बंद केली. एकीकडे सती सारखी अनिष्ट प्रथा बंद झाली असली तरी, दुसरीकडे आजही नवरा मेल्यानंतर त्याच्या बायकोला समाज ‘रडकी’ म्हणून हिणवल्याचं अनेक समाजात पाहायला मिळतं.

महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळ्याचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी नवऱ्याच्या पश्चात महिलेवर अन्याय होणारी हिच अनिष्ट प्रथा बंद व्हावी यासाठी समाजाला आवाहन केले आहे. पतीच्या निधनानंतर अंत्यविधीच्या वेळी, पत्नीच्या सौंभाग्याची लेणी हिरावून, घेण्याची अनिष्ट प्रथा बंद करण्यात यावे यासाठी प्रमोद झिंझाडे यांनी समाजातील विविध घटकांना आवाहन केले असून, सरकारने देखील यासंदर्भात कायदा करून करणं गरजेचे असल्याचं म्हटलं आहे.

मी एका अत्यंत महत्वाच्या आणि महिलांच्या स्वतंत्र्यावर गदा आणणाऱ्या अनिष्ट प्रथेवर आपले लक्ष वेधू इच्छित आहे. ही प्रथा म्हणजे, पतीच्या निधनानंतर अंत्यविधीच्या वेळी, मृताच्या पत्नीच्या सौभाग्याचे लेणे असलेले, तिच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, ही अन्यायकारक प्रथा होय. महाराष्ट्रात ही प्रथा आजही आस्तित्वत आहे. पतीला अग्नी दिला जात असताना, स्त्रीची सौभाग्याची ही आभुसने काढून घेतली जातात.

‘स्री’ची ही तिची आभुसने काढून घेत असताना, स्त्रीच्या मनाला किती वेदना होत असतील,याचा आपण विचार करावा. असा प्रसंग, कोणत्याही महिलेवर येणं ही तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी घटना आहे. असं मत प्रमोद झिंजाडे यांनी मांडले असून, समाजातील ज्या घटकांना ही प्रथा बंद व्हावी असं वाटतंय, अशा सगळ्यांनी एकत्र येऊन, या प्रथेविरोधात लढा देणं गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले असून, समाजातील या घटकांना आवाहनही केलं आहे.

पतीच्या निधनानंतर विधवा महिला, विद्रूप दिसावी तिच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहू नये, असा कदाचित त्याकाळी या प्रथेमागे हेतू असावा. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. महिला मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित झाल्या आहेत, अंधश्रध्दा कमी होवून समाज विज्ञानवादी होत आहे. त्यामुळे अशा ‘अनिष्ट’ प्रथा बदलल्या पाहिजेत. विधवा महिलांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात अशा गोष्टींमुळे खूप त्रास सहन करावा लागतो. अशा महिलांना साध्या हळदी कुंकवाच्या, देवधर्माच्या वा कोणत्याही शुभ कार्यात बोलावले जात नाही. उलट त्यांना अशा कार्यक्रमात डावललेच जाते.

महिला विधवा झाली म्हणजे ‘रंडकी’ झाली. असे म्हणून तिला समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाद केले जाते, हे अन्यायकारक आहे. अशा प्रथा थोड्याफार फरकाने इतर राज्यातही असतील. मात्र, ही अनिष्ट प्रथा, पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी पुरोगामी विचाराच्या सर्व महिला पुरुषांनी चळवळ उभी करून, या प्रथेविरुध्द समाज प्रबोधन करण्याची व शासनास ही प्रथा बंद करण्यासाठी कायदा करण्यास लावण्याची गरज आहे.

अशा प्रथांमुळे महाराष्ट्राच्या एकूण जनतेपैकी अर्धी जनता बाधित होत आहे, हे विचारात घेतले पाहिजे. त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व महिला,पुरुष, प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त न्यायमूर्ती, सामाजिक संस्था, संघटना तसेच ज्यांना ज्यांना ही प्रथा अनिष्ट व अन्यायकारक वाटते, अशा सर्वांनी या कामात पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीतजास्त समविचारी महिला व पुरुषांनी ही प्रथा बंद व्हावी याबाबत गांभीर्याने विचार करावा असं वाटतं.

तरी या विषयाबाबत आपणास काय वाटते, याबाबत आपल्या लेखी प्रतिक्रिया माझ्या खालील व्हॉट्सॲपवर कळवाव्यात ही विनंती. प्रतिक्रिया कळवितांना, आपण आपले पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल व व्हॉट्सॲप क्रमांक आदी माहिती पाठवावी, जेणे करून आपणास या विषयावर आँनलाईन किंवा आँफलाईन चर्चा सत्र आयोजित करण्यास मदत होईल. सर्वांनी हा मेसेज महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावा ही विनंती. हे लिहितांना कोणी दुखावले जावे हा माझा हेतू नाही, तर महीला विरोधी ही एक अनिष्ट प्रथा बंद व्हावी, हा यामागचा हेतू आहे हे, कृपया सर्वांनी लक्षात घ्यावे ही विनंती.

लेखक: प्रमोद झिंजाडे, महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा, जि. सोलापूर. मोबाईल नंबर – 7775903052 व्हॉट्सॲप नंबर -9421042072.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.