लग्नाची वरात चक्क ‘हार्वेस्टर’वरून काढली; शेतकऱ्याचा नादच खुळा, व्हिडिओ व्हायरल…

0

लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा असतो. खास करून नवरी आणि नवरदेव आपल्या जीवनाची नवीन इनिंग सुरू करणार असल्याने त्यांच्यासाठी हा सुवर्णकाळ मानला जातो. आपले लग्न हे धुमधडाक्यात व्हाव, असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि म्हणूनच जवळपास अनेक जण एक-एक वर्ष अगोदर लग्नाची तयारी सुरू करताना देखील आपण पाहिलं आहे. अनेक वेळा लग्नाची केलेली तयारी ही, सोशल मीडियावर चर्चेचा विषय देखील ठरत असते.

अशीच एका लग्नाची रंजक गोष्ट आज आपण पाहणार आहोत. आपलं लग्न हे प्रत्येकाचं आकर्षण बनलं पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या लग्नाची चर्चा आसपासच्या चार गावात व्हावी, अशी नवरदेव-नवरी बरोबरच त्यांच्या मातापित्यांची देखील इच्छा असल्याचं आपल्याला अनेकवेळा पाहिला मिळते. लग्नामध्ये जेवणाची व्यवस्था, जेवायला कोण-कोणते पदार्थ ठेवायचे? या बारीक सारीक गोष्टींकडे देखील आपण बारकाईने लक्ष ठेवून असतो.

जालना जिल्ह्यातील, आंबड तालुक्यातील ‘धाकलगाव’मध्ये दोन दिवसांपूर्वी झालेलं एका शेतकऱ्याचं लग्न सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ‘गणेश पवार’ या शेतकरी ‘नवरदेवा’ने आपल्या लग्नाची वरात घोड्यावर बसून काढण्याऐवजी चक्क गहू करायच्या हार्वेस्टर मशिनवर बसून काढल्याने आसपासच्या अनेक गावात या ‘गणेश’च्या वरातीची जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

गणेशने हार्वेस्टरवर काढलेली वरात हा आता चर्चेचा विषय बनला असून, ही कल्पना त्याला सुचली कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, या कल्पनेचं अनेकांनी कौतुक देखील केलं आहे. अनेक वेळा आपण पाहतो नवरदेवाची वरात घोड्यावरच काढली जाते. ग्रामीण भागात जवळजवळ हा पॅटर्नच बनलाय. मात्र शेतकरी कधी काय शक्कल लढवेल, आणि तो कधी काय करेल? याचा काही नेम नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं पाहायला मिळत आहे.

विनाकारण घोड्यावर पैसे खर्च करण्यात काहीही अर्थ नाही. आणि घोडा कधी काय करेल, याचाही काही नेम नाही. सगळेजण घोड्यावर वरात काढतात,आपण वेगळं काहीतरी करायचं. आपल्याकडे जे आपलं स्वतःच हार्वेस्टर मशीन आहे. त्याच्यावरच जर आपण वरात काढली तर हे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं होईल, आणि शेतकरी असल्याचा एक प्रकारे अभिमानही वाटेल. हा यामागचा उद्देश होता, असं नवरदेवाचे मावस भाऊ, मशीन मालक ‘बळीराम गाडे’ यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना म्हटलं आहे.

 

गणेश पवार या नवरदेवाने आपली वरात, गहू करण्याचे यंत्र हार्वेस्टरवर बसून काढल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, या कल्पनेचं आणि वरातीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. गणेश हा एक प्रगतीशील शेतकरी असून, ऊस, कापूस अशी अनेक पिके तो आपल्या शेतातून घेतो. शेतीबरोबरच ‘शेतकरी राजा हार्वेस्टर’ म्हणून हारवेस्टर मशीनचा उद्योग देखील त्याचा आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.