‘या’ कारणामुळे उपसरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्य ‘अपात्र’; जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने गावात खळबळ
इम्रान शेख, चांदवड प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी लोकांमध्ये आता हळूहळू जागृकता निर्माण होताना पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यातल्या काही ग्रामपंचायतींनी आपला नावलौकिक देशभर पसरवल्याने आता अनेक ग्रामपंचायतींचे प्रशासकीय अधिकारी आणि सरपंच, सदस्य देखील आपल्याही ग्रामपंचायतीचं नाव देशभरात घेतलं जावं, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना पाहायला मिळतात. मात्र राज्यात अशाही काही ग्रामपंचायती आहेत, ज्यांचा गलथान कारभार बघून तुमचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही.
भास्करराव पेरे पाटील, पोपटराव पवार, यांसारख्या सरपंचांनी तर ग्रामपंचायतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. डोंगराच्या कडेला असणाऱ्या गावाचाही कायापालट करता येऊ शकतो, मुबलक पाणी उपलब्ध करता येऊ शकतं, आणि या कामाच्या जोरावर सरपंचाला ‘पद्मश्री’ पुरस्कारही मिळू शकतो, ही कल्पनाही कोणी केली नसेल, मात्र ही किमया ‘हिवरे बाजार’चे संरपंच पोपटराव पवार यांनी करून दाखवली आहे.
एकीकडे पाटोदा, हिवरेबाजार सारख्या ग्रामपंचायतींनी गावाचा कायापालट करण्याचं काम केलं असलं तरी, दुसरीकडे राज्यात काही ग्रामपंचायतींमध्ये कमालीचा भष्टाचार उघड होताना वारंवार पहिला मिळतं. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील ‘चांदवड’ तालुक्यातील ‘तळेगाव रोही’ या गावाच्या ग्रामपंचायतीत घडल्याचं समोर आलंय. १४व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आलेल्या निधीत मोठ्या प्रमाणात भष्टाचार झालेच्या आरोपावरून उपसरपंचासह सहा जणांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्याची घटना समोर आली आहे.
१०१७ ते २०२१ या वित्तीय वर्षात 14व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीमध्ये या बहाद्दरांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची लेखी तक्रार, ‘अन्वर पठान’ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली होती. या संदर्भातला चौकशी समितीने आपला अहवाल अप्पर जिल्हाधिकारी यांना सादर केल्यानंतर, जिल्हाधिकारी ‘मायादेवी पाटोळे’ यांनी ‘उपसरपंच’ बाबाजी वाकचौरे, अर्चना ठाकरे, योगिता कदम, संतोष वाकचौरे, कांताबाई भोकनळ आणि निर्मला घुमरे अशा एकूण सहा ग्रामपंचायत सदस्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ‘अपात्र’ घोषित केलं.
या कारवाई संदर्भातला लेखी आदेश जिल्हाधिकारी यांनी चांदवड तहसिलदार, गट विकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना कळल्यानंतर सर्व ग्रामस्थानी या कारवाईचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. सर्वसामान्य जनतेच्या विकास निधीत हस्तक्षेप करून, गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता. मात्र आता या कारवाईमुळे येणाऱ्या काळात नागरिक आपला लोकप्रतिनिधी निवडताना नक्कीच विचार करतील, आणि लोकप्रतिनिधी देखील आपल्या कारभारावर नागरिक लक्ष ठेवून आहेत, या भावनेतून काम करतील. या कारवाईमुळे आता विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया अन्वर पठाण यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना दिली.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम