AUSvNZ T20 World Cup Final: न्यूझीलंडला स’व्याज’ परतफेड करण्याची मोठी संधी;’टॉस’ जिंकणारा संघच जिंकणार विश्वचषक

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर आज, टी-20 विश्वचषक २०२१ चा फायनल संध्याकाळी साडेसात वाजता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. (T20 World Cup final AUSvNZ)  या टी-ट्वेन्टी २०२१च्या विश्वचषकाचा विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टी-ट्वेण्टी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोणालाही हे दोन संघ फायनलमध्ये धडक मारतील, असं वाटलं नव्हतं. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले.

या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान Pakistanआणि इंग्लंड England संघाने आपापल्या गटात अव्वल स्थान राखत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र दोन्हीं संघांना आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाकडून, पराभव पत्करावा लागला. आणि या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. अनेक क्रिकेट दिग्गजांनी हे दोन संघ फायनलमध्ये प्रवेश करतील, असं भाकित केलं होतं. मात्र दोन्ही संघांना सेमीफायनलमध्ये आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी चांगलाच धक्का दिला, आम्ही देखील प्रमुख दावेदार असल्याचे सिद्ध करून दाखवले.

सेमी फायनलमध्ये विजयी झालेल्या दोन्ही संघांनी धावांचा पाठलाग करून विजय संपादन करत, फायनलमध्ये धडक मारली आहे. पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्‍यूझीलंड संघाने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इंग्लंड संघाचा पराभव केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड संघासमोर १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. १६७ धावांचे बलाढ्य आव्हान न्‍यूझीलंड संघाने खराब सुरुवातीनंतरही पूर्ण केले. दुसरीकडे दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा देखील पराभव धावांचा पाठलाग करूनच केला.

पाकिस्तान संघाने देखील ऑस्ट्रेलिया संघासमोर मोठी धावसंख्या उभारली होती. पाकिस्तान संघाने फकर जमान आणि मोहम्मद रिजवान यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलिया संघाची देखील सुरुवात खूपच निराशाजनक झाली होती. ९५ धावांत सुरुवातीचे पाच प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर देखील ऑस्ट्रेलिया संघानी एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत फायनलचे तिकीट मिळवलं. आणि म्हणूनच आता फायनलमध्ये टॉस हा खूप मोठा फॅक्टर ठरणार असल्याचं बोललं जातंय.

दुबई क्रिकेट ग्राउंडवर धावांचा पाटलाग करणाऱ्या संघाने अधिक सामने जिंकले असल्यामुळे, आणि सेमीफायनलमध्ये दोन्ही सामने या दोन्ही संघांनी धावांचा पाठलाग करूनच जिंकले असल्यामुळे, या सामन्यात ‘टॉस’ला फार मोठे महत्त्व असणार आहे. दोन्हीं संघाचे कॅप्टन ‘टॉस’ जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडणार यात अजिबात शंका नाही. दोन्ही संघांच्या ताकदीविषयी बोलायचं झालं तर, दोन्ही संघ सारखेच असल्याचं दिसून येतं.

‘नॉक आउट’ सामन्यात खेळण्याचा अनुभव ऑस्ट्रेलिया संघाला जास्त असल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ थोड्याफार प्रमाणात सरस वाटतो. मात्र न्यूझीलंड संघाच्या जमेची बाजू म्हणजे केन विल्यमसनची कॅप्टनसी. न्यूझीलंडचा संघ कितीही दबावात असला तरी, केन विल्यमसन पॅनीक होताना पाहायला मिळत नाही, हीच या संघाची खूप मोठी ताकद असल्याचं बोललं जातं. आॉस्टेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१५च्या विश्वचषकात फायनलमध्ये न्यूझीलंडचा आॅस्ट्रेलियने पराभव केला होता. याची परतफेड करण्याची संधी आता न्यूझीलंडकडे चालून आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरताना मोठ्या निर्धाराने उतरताना पाहायला मिळणार आहे.

तर दुसरीकडे आतापर्यंत सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे २०१५ नंतर एकही आयसीसी ट्रॉफी नसल्यामुळे, ते देखील या सामन्यात मोठ्या तागदीने उतरणार आहेत. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्हीं प्रकारात न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलिया संघापेक्षा थोडा सरस वाटतोय. फलंदाजीचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाकडे न्युझीलंडपेक्षा थोडी चांगली फलंदाजी आहे. त्यातच सेमी फानलमध्ये महत्त्वपूर्ण खेळी करणारा ‘डेव्हॉन कॉन्वे’ डाव्या हाताला झालेल्या फॅक्चरमुळे सामना खेळू शकणार नाही. हा न्यूझीलंडसाठी चिंतेचा विषय आहे.

डेव्हॉन कॉन्वे’च्या जागी ‘टीम सेफर्ट’ याला संधी देण्यात आली आहे. ‘ग्लेन फिलिप्स’ला ‘डेव्हॉन कॉन्वे’च्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याची शक्यता असून ‘टीम सेफर्ट’ याला पाचव्या क्रमांकावर पाठवण्यासंबंधी चर्चा सुरू असल्याचं मुख्य प्रशिक्षक ‘गॅरी स्टेड’ यांनी सांगितले आहे. भारतीय वेळेनूसार संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार असून दोन्हीं संघ तुल्यबळ आहेत. जो संघ या सामन्यात टॉस जिंकेल त्या संघाकडे विश्वचषक जिंकण्याची संधी अधिक असणार आहे. त्यामुळे जो संघ धावांचा पाठलाग करणार आहे, तो संघ हा विश्वचषक जिंकेल असं म्हटलं तरी अतिशोक्ती होणार नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.