Mohammed shami: मोहम्मद शमीला ‘ट्रोल’ करून तुम्ही तुमच्या सडलेल्या मेंदूचं प्रदर्शन केलंत; मोहम्मद शमी प्रखर ‘राष्ट्रभक्तच’

क्रिकेट(cricket) हा सांघीक खेळ असून, या खेळात एकूण ‘अकरा’ खेळाडू मैदानावर खेळत असतात. आपल्याला ज्या संघासोबत खेळायचं आहे, त्या संघाने जर प्रथम फलंदाजी केली तर, त्या संघाने जेवढ्या धावा केला आहेत, त्याच्यापेक्षा एक धाव जास्त केली तर, त्या सामन्यात आपण विजयी होत असतो. याउलट जर आपण प्रथम फलंदाजी केली तर,आपण केलेल्या धावांएवढी धावसंख्या समोरच्या संघाला उभारू दिली नाही तरच आपण विजयी होतो. आणि हे काम मैदानात खेळणाऱ्या एकूण ११ खेळाडूंना मिळून करायचं असतं.

हा क्रिकेटचा साधा आणि सरळ नियम आहे. तुम्ही म्हणाल, “महाराष्ट्र लोकशाही”ला आज नेमकं झालंय तरी,काय? क्रिकेटचा हा नियम तर सगळ्यांनाच माहीत आहे. तरीदेखील महाराष्ट्र लोकशाही असं का बोलतेय? असा तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर, ही संपूर्ण बातमी वाचल्यावर या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला मिळेल.

24 तारखेला रविवारी झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानने, भारतीय संघाचा ‘दहा विकेट’ राखून पराभव केला. (Pakistan defeated India by ten wickets) आणि संकुचित विचाराच्या काही भारतीयांनी सोशल मीडियावर भारताचा स्टार गोलंदाज ‘मोहम्मद शमी’ला ट्रोल करायला सुरुवात केली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून झालेला आपला दारुण पराभव हा प्रत्येक भारतीयांच्या जिव्हारी लागणारा आहे. मात्र हा पराभव एकट्या मोहम्मद शमीमुळे झाला. असा अजब तर्क लावत मोहम्मद शमीला शिवीगाळ करण्यात आली. ही अतिशय निंदनिय बाब आहे.

पाकिस्तानने पराभूत केलेल्या या सामन्यात, भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला पाकिस्तानचा एकही गडी बाद करता आला नाही. पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या प्रत्येक गोलंदाजांचा खडसून समाचार घेतला. मात्र टारगेट फक्त मोहम्मद शमीलाच करण्यात आलं. हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय असून एक भारतीय म्हणून या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही.

एका विशिष्ट समुदायावरून मोहम्मद शमीला ट्रोल केलं गेलं. मात्र त्याच्यापाठीशी अनेक दिग्गज खेळाडू,नेते मंडळीसह संपूर्ण भारत उभा राहिला. ही या देशाची महानता आहे. समाज कोणताही असो, कट्टरता असेल तर, ती देशासाठी घातक असते. हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. खेळ कोणताही असो, तो खेळाडू वृतीनेच खेळायचा असतो, आणि पाहायचा सुद्धा खेळाडू वृत्तीनेच असतो. आणि हे ज्याला जमत नाही, ती मंडळी आपला मेंदू सडल्यासारखं बरळत असतात, याचंच हे एक उदाहरण आहे.

एकीकडे भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीवर ऑनलाइन अटॅक झाला, हे पाहून प्रचंड वेदना झाल्या. तर दुसरीकडे मोहम्मद शमीच्या पाठीशी संपूर्ण देश उभा राहिला या गोष्टीचा प्रचंड अभिमानही वाटतोय. भारतासाठी खेळणारा कुठलाही खेळाडू, या ऑनलाइन ट्रॉलर्स पेक्षा अधिक देशभक्त असतो. हे या ट्रोलर्सना कधीही करणार नाही.

भारतीय संघाचा मोहम्मद शमी हा एक स्टार गोलंदाज आहे. (Mohammad Shami is a star bowler for the Indian team.) आणि त्याला आपली राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याची काहीही आवश्यकता नाही. यापूर्वी त्याने अनेक वेळा भारतीय संघाला अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. आपली चार महिन्याची मुलगी आयसीयूमध्ये असतानासुद्धा या वाघाने देशाला प्राधान्य देत भारतीय संघाला सामना जिंकून दिला होता. हे देश अजूनही विसरला नाही.

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.