T20 World Cup 2021: हार्दिक पांड्या,भुवनेश्वर कुमारचा पर्याय शोधण्याचे भारतासमोर मोठे आव्हान; ..तर साखळीतच गुंडाळावा लागणार गाशा
T20 World Cup 2021: टी- ट्वेंटी विश्वचषकासाठी निवड समितीने भारतीय संघ निवडला, त्याच वेळी अनेकांनी या संघ निवडीवर टीका केली होती. विश्वचषकासाठी निवडलेल्या ‘स्कॉड’मध्ये तब्बल पाच स्पिन गोलंदाजांचा समावेश असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र काही दिवसानंतर निवड समितीच्या ‘ही’ चूक लक्षात आल्यानंतर अक्षर पटेलला बळीचा बकरा बनवला. आणि त्याच्या जागी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली. खराब फॉर्म आणि पाठीच्या दुखापतीतून पुरता सावला नसलेला, हार्दिक पांड्याची जागा भरून काढण्यासाठीच शार्दुल ठाकूरची निवड झाली आहे, वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ संघ निवडताना निवड समितीने विश्वचषकाच्या तयारीचा कोणताही अभ्यास केला नव्हता, हे स्पष्ट होतं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काल झालेल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला दहा गडी राखून धूळ चारली. या लाजिरवाण्या पराभवालामुळे भारतीय संघासमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. भारतीय संघाचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनी असल्यामुळे संघ निवडी बरोबरच,अनेक डावपेचात भारतीय संघाला त्याचा फायदा होईल, असं सगळ्यांकडून बोललं जात होतं. मात्र कालच्या सामन्यात हे जाणवलं नाही. भारतीय संघाला अंतीम अकराचा संघच निवडता आला नाही. त्याचबरोबरच विराट कोहलीचा संघ कुठेही आपली रणनीती करताना पाहायला मिळाला नाही. धोनी ‘मेंटॉर’ म्हणून उपलब्ध असतानाही, भारतीय संघाने केलेल्या या चुकांमुळे सोशल मीडियावर आता चर्चांना उधाण आले आहे.
अंतीम अकराचा संघ निवडताना प्रत्येक संघ, सहाव्या गोलंदाजाचा पर्याय शोधत असतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये जर सहा गोलंदाज असतील तरच तुम्ही उत्तम संघ निवडला आहे असं समजलं जातं. मात्र भारतीय संघ प्रमुख चार गोलंदाज आणि एक स्पिन ऑल राऊंडर, रवींद्र जडेजाला घेऊन मैदानात उतरला तिथेच भारतीय संघ हा सामना हरल्याचे पाहायला मिळालं.
कोणताही संघ सहाव्या गोलंदाजीचा पर्याय घेऊन मैदानात उतरला नाही, तर तुम्ही या सामन्यात कायम बॅकफूटवर रहाल. महेंद्रसिंग धोनी ‘मेंटॉर’ असून देखील ‘विराट कोहली’ला हे का समजलं नाही? हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर विजयाचं निम्म श्रेय महेंद्रसिंग धोनीला जाणार असेल तर, संघ व्यवस्थित निवडला गेला नाही, याबाबत धोनीला देखील जबाबदार का धरू नये?
वर्षभरापासून हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म, क्रिकेट चाहते पाहत आहेत. शिवाय तो पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्तही आहे. विश्व चषकासाठी तो गोलंदाजी करेल म्हणून त्याची निवड केली गेली. मात्र तो आता गोलंदाजी करत नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार, त्याने पाठीच्या दुखापतीसाठी नुकतीच चार इंजेक्शन देखील घेतल्याची माहिती मिळतेय. जर तो खराब फॉर्म, त्यासोबतच पूर्णपणे तंदुरुस्त ही नव्हता, तर मग त्याची भारतीय संघात निवड कशी केली गेली? या प्रश्नाचे उत्तर आता निवड समितीला द्यावी लागणार आहे.
‘अक्षर पटेल’च्या जागी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली असली तरी, हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून शार्दुची निवड केली आहे. हे चाहत्यांना चांगलंच माहिती आहे. हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्तही नाही. त्याचबरोबर सध्या तो खराब फॉर्ममधून जात आहे, तर मग दुसरीकडे शार्दुल भन्नाट फॉर्ममध्ये असतानाही त्याची हार्दिक पांड्याच्या जागेवर अंतिम अकरामध्ये निवड का केली गेली नाही? असा प्रश्न चाहत्यांनी हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकुरचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड केला होता.
दुसरीकडे भुवनेश्वर कुमार देखील आपल्या खराब फॉर्ममधून जात आहे. तो देखील पूर्णपणे तंदुरुस्त नाही. याउलट दुसरीकडे हर्षल पटेल, मोहम्मद सिराज सारख्या भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या गोलंदाजाचा या विश्वचषकासाठी का विचार केला गेला नाही? हा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या फिरकीचा जाळ्यात अनेक फलंदाजांना पसरवत, अनेक सामने एकहाती जिंकून देणाऱ्या युजवेंद्र चहलच्या जागी राहुल चाहरला संधी देण्यात आली. चहल पेक्षा चाहर या खेळपट्टीवर अधिक प्रभावी ठरेल. असं निवड समितीकडून सांगण्यात आलं. मग चाहरला अंतिम अकरामध्ये स्थान का मिळाले नाही?
एका पराभवामुळे संपूर्ण भारतीय संघच खराब झाला, असं अजिबात म्हणता येणार नाही. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ 36 धावांवर अॉल-आऊट झाल्यानंतरही मालिका जिंकण्याचा भारतीय संघानेच इतिहासिक पराक्रम केला होता. मात्र या विश्वचषकामध्ये पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अंतिम अकराचा संघ निवडला, यावरून हा संघ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल असं वाटत नाही.
जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नसेल, शिवाय तो गेल्या वर्षभरापासून अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे. याशिवाय दुसरीकडे शार्दुल ठाकुर भन्नाट फॉर्ममध्ये असतानाही त्याला अंतिम 11 मध्ये स्थान दिलं नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे महेंद्रसिंग धोनी मेंटॉर असून देखील त्याचा ही गोष्ट कशी काय लक्षात आली नाही,असंही आता बोललं जाऊ लागलं आहे.
पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय संघावर आता सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचे देखील मोठे आव्हान असणार आहे. 31 तारखेला होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जर भारताचा असाच पराभव झाला तर, भारतीय संघाला या स्पर्धेमधून आपला गाशा गुंडाळावा लागण्याची, शक्यताही नाकारता येत नाही. टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये न्यूझीलंडचे भारताविरुद्ध कमालीचे रेकॉर्ड आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत टी ट्वेंटी विश्वचषकात एकदाही जिंकलेला नाही. त्यामुळे या सामन्यात संपूर्ण दबाब भारतीय संघाला असणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताना भारतीय संघाला, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारचा पर्याय शोधूनच मैदानात उतरावं लागणार आहे. अन्यथा भारतीय संघाला या स्पर्धेतलं आपलं आव्हान टिकवणं अवघड जाणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम