चिडलेल्या बच्चू कडूंनी आच्याऱ्याच्या कानाखाली वाजवल

0

 

प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी रुग्णालयात स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. अकोल्यामधील सर्वोपचार रुग्णालयामध्ये करोना रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिलं जात असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर बच्चू कडू यांनी रुग्णालयाला भेट दिली व पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिल्यानंतर भडकलेल्या कडू यांनी कानशिलात ठेवून दिली.

सर्वोपचार रुग्णालयामधील रुग्णांसाठी असणाऱ्या मेसमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराबद्दल माहिती मिळाल्यानंतर अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली होती. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची तपासणी केली असता व त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. रुग्णालयातील कर्मचारी आणि स्वयंपाकी यांच्याकडे रुग्णांसाठी लागणाऱ्या गव्हाबाबत त्यांनी चौकशी केली. यावेळी दोन्ही कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांनी पुन्हा दोघांनाही समोर बोलावून दोघांची चौकशी केली. त्यावेळी पुन्हा दोघांची उत्तरं वेगवेगळी आल्यामुळे संतापलेल्या कडू यांनी स्वयंपाक्याच्या कानाखाली ठेवून दिली.

याविषयी बोलत असताना बच्चू कडू म्हणाले,”अकोल्यातील सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना चांगलं जेवण मिळत नसल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे केली होती. त्यानंतर आपण रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील स्वयंपाक घराची पाहणी केली. पाहणी करत असताना किचन प्रभारी कर्मचारी साहेबराव काळमेठे आणि स्वयंपाकी सुनील मोरे या दोघांकडे चौकशी केली. त्यावेळी किचनची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून दररोज ५ किलो गहू लागत असल्याचे सांगितलं. तर स्वयंपाक्याने ३ किलो गहू वापरत असल्याचं सांगितलं. त्यानंतर दोघांनाही समोरासमोर घेऊन चौकशी केली असता सुनील मोरे यांनी उत्तर बदलून ६ किलो गहू लागत असल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रकारामुळे राग अनावर होऊन आपण कानशिलात लगावली,” असे मंत्री बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आले. या प्रकारानंतर बच्चू कडू यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.