राष्ट्रविकासाचं फुले, आंबेडकरी मॅाडेल…

0

एकदा गौतम बुद्धांना त्यांचा एक शिष्य आनंद प्रश्न विचारतो कि, ‘भन्ते मुलगंध,पुष्पगंध आणि सारगंध असे गंधाचे तीन प्रकार आहेत हे आपण जाणतो पण असा कोणता कंध आहे का जो वार्‍याच्या दिशेने व विरूद्ध दिशेने जातो’? यावर गौतम बुद्ध म्हणाले, ‘महामानवांच्या कीर्तीचा गंध कि जो वार्‍याचा दिशेने व विरूद्ध दिशेने प्रवाहित होतो.’ असाचं गंध सर्वदूर सर्वत्र पसरलेले दोन महामानव म्हणजे महात्मा फुले व भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर.

वास्तविक पाहता म.फुले व बाबासाहेब आंबेडकर दोघेही आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत.दोघांचे कार्य म्हणजे समाजसुधारणेच्या इतिहासाचा भक्कम पाया.फुले- आंबेडकरांचे कार्य,त्यांचे विचार, दूरदृष्टी,अभ्यास अशा बाबी जाणुन घेणे म्हणजे राष्ट्रविकासासाठीचं आवश्यक असं महत्त्वाचं मॅाडेल समजुन घेणं..

म.फुले म्हणजे महाराष्ट्राचे मार्टिन ल्थूथर किंग.११ एप्रिल १८२७ ला जन्मलेले जोतीराव गोविंदराव फुले हाडापराने मजबूत, प्रकृतीने सदृढ आणि रूपाने देखणे होते. लहानपणापासून वाचनाची आवड होती. सुरवातीच्या काळामध्ये शिक्षणामध्ये खंड पडला होता तरीही त्यांनी शिक्षण सोडलं नाही. शिक्षणाची ओढ कमी झाली नाही.

चिंतनशील स्वभाव व बौद्धिक कौशल्य लाभलेल्या जोतीबाने संपूर्ण आयुष्य समासुधारणा व लोकसेवेला समर्पित केले.ते बोलघेवडे समाजसुधारक नव्हते तर कृतिशील समाजसुधारक होते.

समाजातील अनिष्ठ प्रथा,परंपरा पाहून ते व्याकूळ होत असत.समाजातील विषमतेची त्यांना चिड येई. ‘अज्ञान म्हणजे अंधार व शिक्षण म्हणजे सूर्यप्रकाश होय’. समाजसुधारणेसाठी शिक्षण हाच प्रभावी मार्ग आहे हे त्यांनी ओळखले होते.

१८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.मुलींना शिकवण्याकरीता शिक्षिका मिळत नव्हती म्हणून स्वतःच्या पत्नीला लिहायला, वाचायला शिकवलं. अस्पृश्यांना शिक्षण मिळत नव्हतं त्याकाळी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली.राहत्या घरातील हौद अस्पृश्यांकरीता खुला केला..१८६३ साली देशातील पहिलं बालहत्या प्रतिबंध ग्रह स्थापन केलं.

महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण,जातिभेद निवारण,स्त्रीमुक्ती चळवळीचे आग्रही म्हणून त्यांना ओळखले जाते. महात्मा जोतीबा फुलेंचं कार्य आणि त्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे.’चूल आणि मुल’ पुरतं मर्यादित राहिलेल्या स्त्रीयांपर्यंत शिक्षणाची गंगा त्यांनी पोहोचवली. ‘ जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ या तत्वांचे ते पाईक होते.

स्त्रीशिक्षणाबरोबरच म.फुलेंनी विधवा विवाह,बालहत्याप्रतिबंध, केशवपण,हुंडा प्रथा बंदी यांसारख्या सामाजिक समस्येवर भरीव कार्य केले.ज्योतीबा फुले ब्राम्हण द्वेष्ठे होते असा आरोप त्यांच्यावर केला गेला.ते ब्राम्हण्यवादावर टिका करायचे हे खरं आहे.पण ते ब्राम्हण द्वेष्ठे नव्हते. खरंतर त्या आरोपात तथ्य नाही.त्यांचे अनेक सहकारी ब्राम्हण होते.काशीबाई या ब्राम्हण स्त्रीच्या मुलाला त्यानी दत्तक घेतलं होतं.हाच तो सावित्री – जोतीबाचा यशवंत.(पुढे डॅा.यशवंत प्लेगच्या साथीमध्ये आई सावित्री गेली तसाच यशवंतही रूग्णांची सेवा करताना लागण होऊन मरण पावला).

जोतीबा फुले हे सामाजिक, समतेच्या चळवळीचे आद्यप्रवर्तक होते.समाजातील पददलितांच्या उद्धाराचे कार्य त्यांनी केले. जातिव्यवस्थेवर आणि दांभिकतेवर त्यांनी कोरडे ओढले.१८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.सत्यशोधक समाजाद्वारे नवी विवाह पद्धती रूजू केली.मंगलाष्टका तयार केल्या.नवर्‍या मुला-मुलींना सत्यवचनी राहण्याची शपथ घ्यावी लागे.मी माझ्या होणाऱ्या आपत्यांना सुशिक्षित करेन चांगलं शिक्षण देईन अशी वचने घ्यावी लागत.

म.फुलेंनी सामाजिक क्षेत्राबरोबरच शेती क्षेत्रांतही खुप मोलाचं योगदान दिलं. शेतक‍र्‍याचा आसुड या ग्रंथामध्ये शेतकर्‍यांचे प्रश्न, कारणे व उपाययोजना मांडल्या.

मागासलेपणा,अज्ञान,कर्जबाजारीपणा ,दारिद्रय यामुळे भारतीय शेतकरी पिचलेला होता.सावकरांकडुन शेतकरी वर्गाचे शोषण होत होते.अशा शोषित लोकांच्या जीवनांत आमुलाग्रह बदल करण्याचा निश्चय त्यांनी केला.शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण द्यावे, सरकारने त्यासाठी खास प्रयत्न करावे,कनिष्ठ वर्गातील लोकांना नोकर्‍यात प्राधान्य द्यावे,शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वोत्परी मदत करावी असा आग्रह त्यांनी धरला. त्यांनी दुष्काळ पीडीतांना मदत देण्यास पुढाकार घेतला होता. धनकवडीच्या दुष्काळ पिढीत विद्यार्थ्यांसाठी कंँपही उभारला होता. शेकर्‍यांना महात्मा फुले सांंगत की शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करा.नवं तंत्रज्ञान आत्मसाथ करा.

जोडधंदा म्हणून पशुपालन करा,आपल्या मुलांस चांगलं शिक्षण द्या. म.फुले शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत सरकारला वेळोवेळी सूचनाही करत असत.तलाव,बंधारे,धरणे,विहिरी यांद्वारे शेतीला जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करुन द्यावे, पिकांच्या संरक्षणासाठी बंदूकांचे परवाने द्यावेत,कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून द्यावेत याबाबत ते आपले विचार सरकारी दरबारी मांडले.सरकारनेही कमी अधिक प्रमाणात त्यांच्या मांगण्या पूर्ण केल्या.

महाराणी व्हिक्टोरियाचे चिरंजीव ड्यूक ऑफ कॅनोट भारतभेटीला आले होते. पुण्यात त्यांना मानपत्र देण्याचा समारंभ झाला. त्या संमारंभात सर्वजण नीटनेटका वेश पोशाख करून आले होते.जोतीबा मात्र शेतकर्‍याच्या साध्या वेशामध्ये कार्यक्रमास उपस्थित होते.डोक्यास मुंडासे, साधा अंगरखा,खांद्यावर घोंगडी असा त्यांचा पेहराव होता.कार्यक्रमात बोलताना संधी मिळाली तेंव्हा त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्याची सोय करा अशी मागणी केली.

१८८२ च्या हंटर आयोगासमोर म.फुलेंनी मुलामुलींना शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे असा आवाज उठवला.शिक्षणाविषयी त्यांचे योगदान आपल्याला माहितच आहे.

स्त्रीशिक्षणाविषयीच्या आग्रही भुमिकेमुळे त्यांना स्वतःचं राहतं घर सोडावं लागलं, कौटुंबिक वाद सहन करावा लागला. अशा स्थितीत स्वतःच्या पत्नीस लिहायला-वाचायला शिकवले.सावित्रीबाईंची खंबीर साथ त्यांना मिळाली. महात्मा फुले म्हणत, नुसतं नोकरीसाठी शिक्षण नव्हे तर शिक्षणामुळे नैतिक, तात्विक व विवेकी वर्तन घडावे.नोकरीसाठी शिक्षण, कारकून निर्माण करणारे शिक्षण काही कामाचे नाही.शीलसंवर्धन,नीतिमत्ता,सौजन्य, व्यवहारज्ञान या गोष्टींवरही त्यांनी भर दिला.

सर्वांना एक गोष्ट कदाचित माहित नसेल की महात्मा फुले हे पुणे मनपाचे कमिशनर होते.त्यावेळी त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली.चांगले रस्ते बांधणे,झाडे लाऊन संवर्धन करणे,शाळा काढणे, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे अशी कामे त्यांनी केली.इतकेच काय तर सांडपाण्याची चांगली व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना केल्या.आरोग्याच्या सोयीकरता देखील त्यांनी कार्य केलं.

महात्मा फुले चांगले उद्योगपती आणि नेशन बिल्डर होते. ‘पुणे कमर्शियल आणि कॅाट्रॅक्टींग’ कंपनीचे कार्यकारी संचालक होते.या कंपनीने धरणे बांधली, कालवे,पुल,बोगदे,इमारती, कापडगिरण्या,रस्ते बांधले.आणि अशा कामातून मिळालेली रक्कम सामाजिक कामासाठी खर्चून टाकली. असे हे महात्मा फुले,खरे कर्ते समाजसुधारक होते. त्यांचं राष्ट्रविकासाचं मॅाडेल देशाच्या प्रगतीकरीता उपयोगी असंच आहे.

अजून एक महामानव म्हणजे भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर.जातीपातीच्या भिंती तोडून स्वातंत्र्य, समता,बंधुभावावर आधारीत नवी समाजरचना निर्माण करण्यासासाठी आयुष्य वेचलेला युगपुरुष! घरची परिस्थिती बेताची, जातिभेदाचे चटके सहन करत शिक्षण पूर्ण केलं.त्यांच्या ज्ञानापुढे,अभ्यासापुढे भलेभले चीतपट झाले.हा माणूस म्हणजे ५०० विद्वानांच्या बरोबरीचा असं म्हटलं तरी वावगे ठरु नये.कोलंबिया विद्यापीठाने नंबर एकचा विद्वान विद्यार्थी म्हणून त्यांचा गौरव केला.अर्थशास्त्रातील विद्वानांनी बाबासाहेबांच्या प्रबंधावर, संशोधन, चिकित्सक दृष्टीकोनावर भाष्य करुन मुक्तपणे स्तुती केली आहे.शिक्षणासाठी, सामाजिक कार्यासाठी सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहुमहाराजांनी मदत केली. बाबासाहेबांनी कायद्याचे शिक्षण घेतलं,लंडन स्कुल ऑफ इकॅानॅामिक्स अँड पोलिटिकल सायन्स या संस्थेतुन पदवी संपादन केली, एम.एस्सी,डि.एस.सी.,बार अँड लॅा आदी पदव्या बाबासाहेबांनी संपादित केल्या.बाबासाहेबाऐवढा व्यासंगी, अभ्यासक आजपर्यंत झाला नाही. धर्मशास्त्राचा त्यांचा अभ्यास म्हणजे भल्याभल्यांची बोटं तोंडात जातील. एवढा अभ्यास होता. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना अर्थशास्त्र, बँकिंग, कायदा हे विषय ते शिकवत असत.एवढं असूनही त्यांना अस्पृश्यता व जातीयतेचे चटके सहन करावे लागले. समाजसेवेसाठी,समाजसुधारणेसाठी कार्य करायचं हे पहिल्यापासुनच त्यांच्या मनामध्ये होतं. संपूर्ण आयुष्य त्यांनी लोककल्याणासाठी वेचलं.

बाबासाहेबांचे सामाजिक कार्य खुप मोठं आहे.म.फुलें,कबीर,बुद्धांना ते गुरु मानत.कबीराचे दोहे बाबासाहेबांना आवडत.अनेक दोहे,संताचे विचार त्यांना तोंडपाठ होती.एवढं खुप शिकून सवरून ह्या व्यक्तीने कधीच पैशाची माया कमावली नाही.नेता कसा असावा तर बाबासाहेबांसारखा असावा.दलितांना संघटित व संघर्षासाठी जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले.महाडचा पाण्यासाठीचा सत्याग्रह,मंदिर प्रवेशाची चळवळ,वृत्तपत्रे चालवणे,ग्रंथ लिहणे ,दलित समाजाला न्याय हक्कासाठी जागृत करणे अशी कार्ये त्यानी सुरूवातीला केली.सुरवातीलाच बाबासाहेब त्यांच्या शिक्षणामुळे, अभ्यासामुळे,व्यसंगामुळे व दृष्टेपणा यामुळे जनमानसात प्रसिद्ध होऊ लागले.१९२० साली शाहुमहाराजांनी दलितेचा नेता म्हणून बाबासाहेबांची घोषणा माणगाव परिषदेमध्ये केली.मुकनायक या पाक्षिकाकरता आर्थिक मदत शाहू महाराजांनी देऊ केली.

बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच ! त्यांच्या problem of the rupee या पुस्तकांवर RBI ची स्थापना झाली.बाबासाहेबांचे अर्थशास्त्री विचार आजही उपयोगी आहेत.शेती क्षेत्राशी संबंधितही बाबासाहेब मार्गदर्शन करतात.शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतीचे राष्ट्रीयीकरण केलं पाहिजे असं ते म्हणतात. शेतकर्‍यांने नुसतं शेतीवर अवलंबून राहू नये त्यानी त्यांच्या मुलाला उद्योग, व्यापार,सेवा क्षेत्रात धाडावं.असंच एक कार्य म्हणजे नदीजोड प्रकल्प.हिमालयातील नद्यांना खुप पुर येत असे तेथील नद्यांचं पाणी दुष्काळ भागात पोहोचावं यासाठी ते आराखडा मांडतात. पाण्याचा उपयोग करुन वीजनिर्मिती करावी हेही बाबासाहेब त्या काळी सांगत.स्त्रीशिक्षणासाठी बाबासाहेब आग्रही होते.एके ठिकाणी बाबासाहेब म्हणाले होते, स्त्रीच्या प्रगतीवरुन देशाची प्रगती ठरवा.यावरून त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन समजून येतो.स्त्रीच्या डोळ्याने जगाकडे पाहिलं पाहिजे असं फुले-बाबासाहेब म्हणत.स्त्रीयांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली.त्यामध्ये स्त्रीयांना नोकरी, वारसा हक्क,वेतन याबाबत तरतूदी केल्या होत्या.कामगारांचे तास कमी करणे, त्यांना वेतन,विमा, संरक्षण मिळावे यासाठी कायदे केले.आज जे लाभ कामगारांना – नोकरदारांना मिळत आहेत त्याचे श्रेय बाबासाहेबांना जाते.बाबासाहेब निसर्ग प्रेमी होते.प्राणीमात्रांचाही ते विचार करत.त्यांनी दोन कुत्रेही पाळलेले होते.बाबासाहेबांना संगीताचीही खुप आवड होती.हार्मोनियम शिकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.म.फुलेंवरच्या एका चित्रपटाच्या कार्यक्रमास बाबासाहेब उपस्थित होते.यावरून ते किती अष्टपैलू होते हे लक्षात येते.

अंततः स्वातंत्र्यापासुन ते आजपर्यंत देश प्रगतीच्या वाट्यावर आहे ते फक्त आणि फक्त भारताच्या संविधानामुळे शक्य होत आहे.काही क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे तर काही क्षेत्रामध्ये आपण प्रगतशील आहोत. ‘संविधान हा देशाच्या विकासाचा – प्रतगीचा आत्मा आहे’. घटनेच्या शिल्पकाराने देशाला आकार देण्याचं कार्य केलं आहे. “जैसा बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले..” फुले-आंबेडकर ही विचारधारा स्वातंत्र्य, समता, बंधूत्व आणि सामाजिक न्यायासोबत ज्ञान, शील, मैत्री, करुणा प्रस्थापीत करण्यासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडते.

शेवटी इतकंच आंबेडकर – फुले राष्ट्रविकासाचं असं मॅाडेल आहे कि जे ‘राष्ट्रविकासासाठी’ खुप महत्वपुर्ण आहे; देशासाठी दिशादर्शक ,मार्गदर्शक आहे..

___पी. डी. कसबे. ( सामाजिक शास्त्राचे अभ्यासक)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.