bishop’s school undri: पुण्यातील ही नामांकित शाळा खेळतेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी; त्या अपघातामुळे शाळेची काळी करतूत उघड..?

0

bishop’s school undri: सोलापूरमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना (ता.९) नुकतीच समोर आली. सोलापूर-पुणे महामार्गावर हा अपघात झाला. यामध्ये भरधाव कंटेनरने मिनी बस आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. या अपघातात धडक बसलेली मिनी बस ही एका शाळेची असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघातग्रस्त मिनी बसवर पुण्यातील उंड्री येथील ‘बिशप्स स्कुल’चे (bishop’s school undri) नाव आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रोज विद्यार्थ्यांना ‘ने आन’ करणारी ही मिनी बस नेमकी रविवार (ता.९) प्रवाशांना घेऊन देवदर्शनासाठी कशी गेली? असा सवाल उपस्थित झाला आहे.

एकीकडे राज्यभरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढत असताना आता इंग्रजी माध्यमातील शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत इतका हलगर्जीपणा दाखवल्याने पालक चांगलेच संतापले आहेत. या भीषण अपघातामुळे आमचे मन हेलावले असून, उद्या असा प्रकार विद्यार्थ्यांसोबत देखील होऊ शकतो, असा संताप व्यक्त करत पालकांनी शाळेवर मोर्चा काढणार असल्याचं महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना सांगितले.

धक्कादायक बाब म्हणजे, भरमसाठ फी आकारून देखील शाळेतील मुलांच्या मिनी बसचा इन्शुरन्स देखील संपल्याची माहिती समोर आली आली. असं असताना देखील विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या या बसला शहराबाहेर इतर प्रवासासाठी परवानगी कशी दिली आणि कोणी हा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच उद्या अशीच परिस्थिती शाळेतील मुलांवर ओढवली, तर शाळा याची जबाबदारी स्वीकारणार का? असे अनेक सवाल उपस्थिती झाले आहेत.

उद्या अशा अपघाताला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच शाळा सोडून इतर वेळेत पैशांसाठी असा प्रवास करणाऱ्या या मिनी बसेसच्या चालक मालकांवर शाळा काही कारवाई करणार का? यासोबतच पालकांच्या प्रश्नांना शाळा कशाप्रकारे उत्तर देणार? कायदेशीर कारवाईला शाळा कशाप्रकारे सामोरे जाणार? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

नेमका कसा झाला अपघात ?

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले. मोहोळ तालुक्यातील कोळेवाडी जवळ सोलापूर- पुणे महामार्गावर कंटेनर मिनीबस आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला. सोलापूर-पुणे महामार्गावर आधी कंटेनर आणि दुचाकीची धडक झाली. त्यानंतर ट्रकने मिनी बसला धडक दिल्यामुळे मिनी बस महामार्गावर पलटी झाली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.