आर्यन खानसाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात; राजकारण तापण्याची शक्यता
२ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला. आणि या क्रूझ ड्रग पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील असल्याचे समोर आले. आणि तेव्हापासून आर्यन खान माध्यमांची हेडलाइन बनलाय.
एनसीबीकडून आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर पुढे तपासात आर्यन खानचा मित्र, ‘अरबाज मर्चंट’ याच्याकडे असणारे ‘ट्रग’ एका खोलीत दोघे मिळून घेणार असल्याचे उघड झाले. हे आर्यन खानने स्वतः कबूल केल्याची माहिती तपासात समोर आली. एवढंच नाही तर या ट्रग चे धागेदोरे विदेशातून असल्याचा संशय व्यक्त केल्याने, आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाली.
सतरा दिवसांपासून आर्यन खान कोठडीत असून,अद्याप आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. आर्यन खान सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानच्या प्रकरणाचा जामिनावरील निकाल ‘एनडीपीएस न्यायालया’ने राखून ठेवला आहे. उद्या बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
मात्र आता या प्रकरणात शिवसेनेने उडी घेतली आहे. आर्यन खानच्या स्वातंत्र्यावर गदा आली असल्याचे म्हणत,शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केल्याची माहिती मिळते. सेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचे नेते ‘किशोर तिवारी’ यांनी संविधानच्या कलम 32 नुसार ही याचिका दाखल केली असून, या याचिकेत म्हटले आहे, एनसीबी आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाची न्यायालयीन चौकशी व्हावी. आर्यनच्या मूलभूत हक्कांचे हनन होत आहे. ‘आर्यन खाल’च्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी व्हावी. न्यायालयाने स्वतःहून याची दखल घ्यावी,अशी विनंती या याचिकेतून शिवसेनेच्या नेत्याने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
काय आहे कलम 32?
संविधानाने देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. जर तुमच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असेल, तर तुम्ही कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता. मुलभूत अधिकारांची अंमलबजावणी होण्यासाठी भारतीय संविधानाने कलम 32 हे घटनेत समाविष्ट केले आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला ‘संविधानाचा आत्मा’ असल्याचंही म्हटलं आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम