नारायण राणेंवर गुन्हा दाखल; केव्हाही होऊ शकते अटक, ‘हे’ आहे कारण..

0

राणे आणि शिवसेना हा वाद आता विकोपाला गेला असून, कोणीही माघार घ्यायला तयार नाही. एकीकडे मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांचा जूहू मधील बंगला हा कोस्टल रेगुलेशन जोन(CRZ) नियमाचे उल्लंघन करून बांधला असल्याचं म्हणत, नोटीसही पाठवली. तर दुसरीकडे केंद्र सरकारने देखील नारायण राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाला दिल्याने राणे चांगलेच अडचणीत आले आहेत.

राणेंच्या दोन्ही बंगल्यावर कारवाई सुरू झाल्यानंतर, आता राज्य महिला आयोगाने देखील नारायण राणेंवर कारवाई करण्याचे आदेश मालवणी पोलिसांना दिले आहेत. राणे यांच्यावर आता तिन्हीं प्रकरणावर सुरू असलेल्या कारवाईमुळे राणे चांगलेच अडचणीत आल्याचे, सध्या पाहायला मिळत आहे. सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाने नारायण राणे यांच्यावर कारवाई केली आहे.

राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत असल्याचे, एकीकडे पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई ही त्याचेच एक उदाहरण असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र आता केंद्र सरकारनेच राणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाला दिले असल्याने राणेंची चांगलीच कोंडी झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, चिवला बीचवरील अनधिकृत “नीलरत्न बंगल्याच्या” बांधकामाप्रकरणी दाखल असलेल्या तक्रारीवरून, भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंन्वायरमेंट, फ़ॉरेस्ट आणि क्लायमेंट चेंज” नागपूर या कार्यालयाने “महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाला” कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. एकीकडे राणे यांच्या दोन्ही बंगल्यावरची कारवाई सुरू असतानाच, आता राज्य महिला आयोगाने देखील राणेवर कारवाई सुरू केली आहे.

नारायण राणे यांनी यापूर्वी देखील सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या नाही तर, त्याची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर त्याची मॅनेजर दिशा सालियनवरही बलात्कार करून तिची देखील हत्या करण्यात आल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं होतं. राणे यांनी हे आरोप करताना या प्रकरणात ठाकरे परिवारचा हस्तक्षेप असल्याचा अप्रत्यक्ष टोला देखील लगावला होता.

मात्र दिशा सालियनच्या आईवडिलांनी आज-तक या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, नारायण राणे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे. पोलिसांनी तो आम्हाला दाखवला आहे. त्यात दिशावर बलात्कार झाला नसल्याचं सरळ म्हटलं गेलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दिशा कुठे कुठे गेली होती? याचं देखील पोलिसांनी आम्हाला स्पष्टीकरण दिलं आहे. असं ‘दिशा’च्या आई-वडिलांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

एकीकडे नारायण राणे यांनी ‘दिशा’वर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचे, एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. मात्र दुसरीकडे दिशाच्या आई-वडिलांनी नारायण राणे यांच्या आरोपांचं खंडन केलं आहे. आणि म्हणूनच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला अर्ज करत नारायण राणे यांनी दिशा सालियन यांची बदनामी केली आहे. आणि म्हणून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा अर्ज देखील महिला आयोगाला दिला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या तक्रारीवरून, आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नारायण राणे यांनी केलेल्या विधानाचा तपशील मालवणी पोलीससांना मागितला आहे. या संदर्भातला अहवाल ४८ तासांच्या आत राज्य महिला आयोगाकडे देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणा संदर्भातील सर्व माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.