सर्वसामान्यांचा खर्च वाढणार, एसटीचा प्रवास महागणार, पेट्रोल, डिझेल नंतर आता तिकितदर वाढणार
मुंबई| कोरोना महामारी मध्ये आलेल्या आर्थिक मंदीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल असून त्यात पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस पुरता वैतागला आहे. आता सर्वसामान्य माणसाच्या खिशाला अजून झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी महामंडळ सुद्धा प्रवास भाड्यात म्हणजेच तिकिटांच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीमध्ये अचानक एसटी महामंडळाचे उत्पन्न कमी झाले. त्यामुळे एसटी महामंडळाला आत्तापर्यंत 12 हजार 500 कोटी रुपये तोटा झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडायला चालले आहेत. त्याचसोबत बसला लागणाऱ्या टायरचे दर सुध्दा वाढले आहेत. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि बसच्या सुटे भागांच्या दरात देखील वाढ झाली आहे.
त्यामुळे महामंडळाने तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिटांच्या दरात तब्बल 17 टक्के दरवाढ करण्यात येणार असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली आहे. दरवाढीचा प्रस्ताव 4 महिन्यांपूर्वी मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरण यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्यावेळी हा दरवाढीचा प्रस्ताव नाकारला होता. आता मात्र हा प्रस्ताव एसटी महामंडळाचे चेअरमन आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सही नंतर नव्याने राज्य परिवहन प्राधिकरणाकडे सोमवारी सादर करण्यात येणार आहे.
एसटी प्रवास भाड्यात होणाऱ्या दरवाढीला काही संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवले होते. राज्य परिवहन प्राधिकरणामध्ये परिवहन आयुक्त, परिवहन विभागाचे सचिव आणि अर्थ खात्याचे सचिव यांचा समावेश आहे. सोमवारी या सर्व प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर प्रवास भाड्यात नेमकी किती वाढ होणार आहे हे समजेल. अशी माहिती समोर आली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकशाहीने अनिल परब यांच्याशी संपर्क साधला परंतू काही कारणामुळे संपर्क होऊ शकला नाही.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांचा पगार महामंडळाने दिला नाही . एकीकडे कर्मचाऱ्यांचा पगार आणि दुसरीकडे गाड्यांच्या डिझेलचे पैसे वसूल होतील एवढे सुध्दा उत्पन्न महामंडळाला मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात पगारवाढ आणि गाड्यांचा खर्च वसूल करायचा असेल तर तिकीट दरवाढ करणे हा एकमेव पर्याय एसटी महामंडळाकडे आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम