मनसेमध्ये मोठी हालचाल
मनसेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे मनसेला पक्ष पातळीवर मोठी हानी झाली नसली तरीदेखील अध्यक्ष पदावरील नेता इतर पक्षामध्ये पक्षप्रवेश करतो यामुळे नकारात्मक संदेश गेला आणि माध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे.
आदित्य शिरोडकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं (मनविसे) अध्यक्षपद राजसाहबांचे पुत्र अमित ठाकरे यांचेकडे जाण्याची शक्यता आहे. या बदलाबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. इकडे सर्व घटनाक्रम चालू असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे अमित ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे तत्काळ नाशिकला दाखल झाले आहेत.
नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा केली जाणार आहे. शक्यतो राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेऊन अमित ठाकरे यांची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं जाहीर करण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं अनावरण आणि पक्षाचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी पार पडलं होतं. त्यावेळी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मनसेने मुंबईयेथील राजगड कार्यालयामध्ये बैठक घेतली होती. या मनसेच्या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पक्षाचे नेते, महिला संघटना, विद्यार्थी संघटना आणि कामगार संघटना पक्षाच्या वाढीसाठी कमी पडलो असल्याचं वक्तव्य केलं होतं.
बाळा नांदगावकरांच्या या विधानावरुनच आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. मुंबईतल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडल्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.