राम सातपुते अमोल मिटकरी यांना’बाजारु विचारवंत’का म्हणाले?

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा सदस्याच्या एक जागेसाठी 17 तारखेला मतदान झाले. कोरोनाची एवढी भयंकर परिस्थिती असताना देखील मतदारांनी या पोटनिवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ६६.१५ टक्के मतदानाची नोंदही झाली.

17 तारखेला मतदान झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेढ्यासह संपूर्ण राज्याचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. भाजप आणि राष्ट्रवादी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं होतं.

“17 तारखेला तुम्ही यांचा कार्यक्रम करा,राज्यात मी यांचा कार्यक्रम करतो”असं आश्र्वासन पंढरपुरकरांना विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी देऊन टाकलं. महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांचीच ‘नक्कल’ करून टाकली.

अजित पवारांनी देखील या नकलेची दखल घेत,”मी एक तर कोणाच्या नादी लागत नाही, आणि लागलो तर,कोणाला सोडत नाही”,असा इशारा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

विरोधकांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्हीं पक्षांनी,या पोटनिवडणुकीचा प्रचार करताना कोणतीही कसर सोडली नाही. देवेंद्र फडणवीसांनी एकाच दिवसात तब्बल सहा सभा घेतल्या. तर दुसरीकडे अजित पवारांनीही निम्म मंत्रीमंडळ प्रचाराच्या रिंगणात उतरवलं.

दोन तारखेला मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारेल?‌ हे कोणालाही सांगता येत नव्हतं. तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढल्यानंतर,पंढरपुरात भाजप निवडून येण्याची शक्यता फारच धूसर होती. मात्र भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

भाजपाच्या समाधान आवताडे यांनी भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. समाधान आवताडे यांनी भालके यांचा अवघ्या तीन हजार सातशे मतांनी पराभव केला असला तरी,पंढरपूरमध्ये भाजप निवडून येण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ ठरल्याने हा विजय ऐतिहासिक मानला जातोय.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे विजयी झाले. हे सत्य असलं तरी,समाधान आवताडे यांचा झालेला हा विजय विरोधक मानायला तयार नाहीत.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी, अवताडे यांचा झालेला विजय हा नैतिकतेला धरून झालेला नाही. अफाट पैशाच्या जोरावर साम,दाम,दंड,भेद वापरून भाजपाने हा विजय मिळवला असल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

 

अमोल मिटकरींच्या या आरोपाला उत्तर देताना भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते चांगलेच संतापल्याचे दिसून येत असून,त्यांनी मिटकरी यांना थेट ‘बाजारु विचारवंत’ म्हटले आहे. विजय हा विजय असतो,कितीही अर्ध नागडे होऊन बोंबलत बसलात,तरी उपयोग नाही. प्रचारात भाषा नीट वापरली तरच विजय होतो. प्रचारसभेतली पिसाळलेली भाषा आता बंद करा. पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने तुमचं तोंड काळं केलं आहे,ते निट पुसून घ्या. पराभव पचवायला शिका! असा घणाघात राम सातपुते यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन’अमोल मिटकरींवर’ केला आहे.

अमोल मिटकरी यांच्या आरोपाला राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने अमोल मिटकरी आता काय बोलणार? हे पाहणं खूप औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर पंढरपूर पोटनिवडणुक हा विषय आणखी काही दिवस चर्चेचा विषय असणार आहे,एवढं मात्र नक्की!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.