खडसे पाठोपाठ भाजपच्या नेत्याही करणार शिवसेनेत प्रवेश
एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील पक्षप्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्याकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. असं त्यांनी वारंवार माध्यमांसमोर सांगितले आहे.
एकनाथ खडसेंबरोबर भाजपमधील अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून बोललं जातंय. यामध्ये बावनकुळे,विनोद तावडे, पंकजा मुंडे अशा अनेक बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश असल्याचं बोललं जातंय. मात्र या नेत्यांनी अद्यापतरी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवलेली नाही.
भारतीय जनता पार्टीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक मंडळींची तिकीट कापली. आणि काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाकडून आयात केलेल्या मंडळींना मोठ्या प्रमाणात तिकीट वाटण्याचं काम केलं. मीरा-भाईंदरमध्ये देखील भाजपने गीता जैन यांचे तिकीट कापून नरेंद्र मेहता यांना दिलं होतं.
भाजपच्या माजी नेत्या गीता जैन यांनी बंडखोरी करत भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला. विशेष म्हणजे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत मेहता यांचा पराभव केला होता.
आता त्याच मीरा भाईंदच्या अपक्ष आमदार गीता जैन उद्या दुपारी बारा वाजता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर होण्याची खात्रीशीर माहिती आहे. बीजेपी विरोधात बंडखोरी करून गीता जैन यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यामुळे त्या बीजेपीचं काम करतील,यात शंकाच होती.
त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवक असल्याचे बोलले जातंय. आणि या नगरसेवकांसोबतच त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपाच्या नगरसेवकांबरोबरच त्या पक्षात प्रवेश करणार असल्याने भारतीय जनता पार्टीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय.
खडसे यांच्या पक्ष प्रवेशानंतर विरोधकांनी भारतीय जनता पार्टीची आता ओहोटी सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात या पक्षाची खूप मोठी ओहोटी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळू शकते,असा टोमणाही विरोधकांनी लगावला आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम