मराठी भाषेचा उगम दोन हजार वर्षापूर्वीचा; प्रा. पी. डी. कसबे
पूर्ववैदिक बोलीमधून मराठी भाषेचा उगम झाल्याचे पुरावे आहेत. त्या आधारे मराठी भाषेचे वय सहजपणे दोन हजार वर्षापेक्षा जास्त असल्याचे सांगता येते. मराठी भाषेचा उगम संस्कृतमधून झाल्याचे सांगितले जाते परंतु यात तथ्य नसल्याचे संशोधन 18 व्या शतकात राजाराम शास्त्रीय भागवत यांनी मांडले. नाणेघाट ( जुन्नर, जि. पुणे) येथे ब्राम्ही लिपीतला बावीसशे वर्षांपूर्वीचा शिलालेखात ‘महारठिनो’ ( मराठी बोलणाऱ्यानो ) हा शब्द आला आहे. यावरून मराठी भाषेची प्राचीनता समजून येण्यात मदत होते.
एक होता कावळा, एक होती चिमणी ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहली गेली ती 800 वर्षांपूर्वी. लिळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली होती. तरी त्या आधी हजारबाराशे वर्षे अगोदर पासून मराठी लोकजीवनात सांगितली जात होती.
मराठी भाषेचा पहिला ग्रंथ विवेकसिंधू जो राजा मुकुंदराज यांनी लिहला होता. 12 व्या शतकात लिहला गेलेला हा ग्रंथ तत्वज्ञानावर आधारित आहे.यात आत्मा, ब्रह्म, मोक्ष, ज्ञान याचे सखोल विवेचन हा ग्रंथ करतो. हा ग्रंथ ओवीबद्ध होता. मराठीतला पहिला आद्य ग्रंथ लीळाचरित्र त्याचे लेखक महिमभट. 1278 च्या सुमारास हा ग्रंथ लिहला गेला.मराठी पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र 1913 साली प्रदर्षित झाला. तो मुकपट होता. आणि पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ जो की 1932 साली साली प्रदर्षित झाला. याचे सर्व श्रेय दादासाहेब फाळके यांना जाते. यावरून आपण म्हणू शकतो मराठी चित्रपटसृष्टी ही भारतीय चित्रपट सृष्टीची जननी आहे. जैन धर्मीय बांधवांचे आगमग्रंथ प्राकृत भाषेत होते. जैन आचार्य व लेखक भद्रबाहू, कालकाचार्य यांनी प्राकृत भाषेत ग्रंथ लेखन केले. त्यांचा कार्यकाल इ.स.2 रे, 3 रे शतक असे होते.
गाथासप्तशती हे महाराष्ट्राचे आद्य लोकसहित्य आहे.इ.स. पहिल्या शतकात सातवाहन राजा हाल यांनी ते संपादित केले होते. ‘सप्त’ म्हणजे ‘सात’ आणि ‘शती’ म्हणजे ‘शंभर’. 700 ओव्याबद्ध स्वरूपात लिहला गेलेला हा ग्रंथ होता.त्यातील एक ओवीचा अर्थ मला सांगावासा वाटतो.
हे चंद्रा तू अमृतमय आहेस, गगनाचा मुकुट आहेस, रजनीच्या मुखावरील तिलक आहेस. प्रियकराला स्पर्श करशील त्याच किरनांनी मलाही स्पर्श कर.
बघा किती सुंदर प्रेम भावना त्याकाळी शब्दात व्यक्त केली होती.
ह्यावरून एक गाणं आठवलं
हे सुरांनो चंद्र व्हा.. चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोहोचवा. आता थोडे पुढे जाऊया
इ. स. 6 व्या शतकात होऊन गेलेला ‘दंडी’ नावाचा कवी काव्यदर्शन ह्या जगप्रसिद्ध काव्य पुस्तकात म्हणतो, ‘महाराष्ट्रश्रया भाषा प्रकृष्ट प्राकृत विदु:
काव्यदर्शनात अपेक्षित असलेला महाराष्ट्र आजचा भौगोलिक महाराष्ट्र नसून त्यात महाराष्ट्रसहित सीमेलगत कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात या प्रदेशामधले काही भाग समाविष्ट होते. मराठी भाषा मोठ्या प्रदेशातील जास्तीत जास्त लोकांना समजत होती. जैन लोकांची ती साहित्यभाषा होती.
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक व्यक्तीनी विविध क्षेत्रात यश मिळवले. काही उदाहरणार द्यायची झाली तर डॉ. रघुनाथ माशेलकर, आमचा बाप आणि आम्ही हे जागतिक कीर्तीचे पुस्तक लिहणारे डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. आनंदीबाई जोशी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, मुबंई विद्यापिठाचे माझी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, अव्वल दर्जाचे विज्ञान मराठी साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर अशा कित्येकांची नावं तुम्हाला सांगू शकतो. मराठी भाषेविषयी न्यूनगंड न बाळगता अभिमान वाटायला पाहिजे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे इंग्रजीवर तितकेच प्रभुत्व मिळवलेले मंगेश पाडगावर, पूल देशपांडे, विजय तेंडुलकर अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील.डॉ. रखमाबाई राऊत भारतातील प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या.
मित्रांनो, वि.स. खांडेकर यांनी मराठी साहित्याला ‘ययाती’ च्या माध्यमातून पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला.जगतगुरू तुकोबारायाचे मराठी साहित्य आता इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्यापैकी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी भाषांतरीत केलेलं Says tukaram हे पुस्तकं एका इंग्रजी भाषेतील नोबेल पारितोषिक विजेत्याने वाचले. आणि त्याने असे उदगार काढले की,
” जगातील सर्वात मोठा इंग्रजी भाषेतला साहित्यिक शेक्सपिअर असं मी म्हणत होतो परंतु तुकारामाचे साहित्य वाचले तेंव्हा 100 शेक्सपिअर ओवाळून टाकावा एवढा मोठा तुकाराम होता.
मंडळी हा गौरव फक्त तुकोबारायाचा नसून मराठी व्यक्तीचा आहे,मराठी भाषेचा आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. जसं आपण मराठीवर प्रेम करतो अगदी तसं प्रेम काही विदेशी व्यक्तीनी सुद्धा केलं. मॅक्सिन बर्णस्टेन. ह्या अमेरिकेन होत्या. 1966 साली भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी फलटण, जि. सातारा येथे आल्या.त्या इरावती कर्वेच्या मैत्रीण होत्या. मराठीवर त्यांनी अतोनात प्रेम केलं. मराठी शाळा काढल्या. त्या उत्तम मराठी लिहित, बोलत असे. फलटण शहरात त्यांनी मराठी शाळा काढली. मॅक्सिन मावशीची शाळा म्हणून आजही प्रसिद्ध आहे.गेल आमव्हेट स्त्रीवादी लेखिका, संशोधक, समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. फुले -आंबेडकरांच्या विचाराने भारावून गेल्या. महाराष्ट्र मराठी संस्कृती त्यांना खूप आवडली. आणि त्या मराठी व्यक्ती भारत पाटणकरांच्या सौभाग्यवती झाल्या.अजून एक गोष्ट तुम्हास सांगावी वाटते की एक बेळगावचा मराठी भाषिक व्यक्ती. मराठीवर आतोनत प्रेम करणारा हा इसम चक्क अमेरिकेच्या संसदेत दोनवेळा खासदार म्हणून निवडून आला. त्या व्यक्तीच नावं आहे. श्री. ठाणेदार. गरीब, सामान्य कुटुबातून येऊन पुढे जाऊन ज्ञान, अभ्यास, व्यासंग आणि काहीतरी चांगलं करू पहायची धडपड असलेला श्री. ठानेदार. अतिशय सुंदर मराठी बोलतात.त्यांच्या बाबतीत इतकंच म्हणावं वाटतं मराठी मन, मराठी अभिमान असलेला माणूस.
मित्रांनो आता पुढील मुद्द्याकडे तुमचं लक्ष नेऊ इच्छितो. मराठी गाण्याने आपल्या सर्वांचे भाव विश्व समृद्ध केलं आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेही पैंजा जिंके |
आता आपण मराठी भाषेतला भक्तीरंग पाहू
संत चोखामेळा म्हणतात, अबीर गुलाल उधळीत रंग |नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग |
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ |
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ||
सुख दुःखा संसारा विषयी बहिणाबाई म्हणतात
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर.
ही मराठीची गोडी आहे.
अरे खोप्या मधी खोपा
सुगरणीचा चांगला,. पहा पिल्लासाठी तिनं. झोका झाडाला टांगला.
सुरेश भट म्हणतात, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, जाईच्या पाकळ्यास दवं अजून सलते ग.. बायको रुसून जेव्हा माहेरला जाते. मग तेंव्हा तिचा नवरा असा रुसवा काढला” सांगा ह्या वेढीला, माझ्या गुलछडीला
हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला..
असो मराठी माणूस रुसवा काढण्यात जगात एक नंबरला आहे हं! आता आपण पुढे जाऊ
हे बघा मराठी नवरा बायको सुखी संसाराची स्वप्नं कशी पाहतात ते आपण गाण्याच्या माध्यमातून पाहू
तुज्या माज्या संसाराला आणि काय हवं, तुज्या माज्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामंदी काय नविन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल,
दिस जातील, दिस येतील,भोग सरंल, सुख येईल..
प्रत्येक मराठी माणसाच्या स्वप्नाला मराठी गाण्यांनी बळ दिलं..
मंगेश पडगावकरांनी मराठी माणसाला सकारात्मक दिली. ती पुढील गीताने.. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. पाडगावकर प्रेमाच्या सहवासाला किती सुंदर शब्दात व्यक्त करतात ते आपण पुढील गाण्यातून समजून घेऊ..
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या…
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा,
तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा..
मराठी गाण्यासोबत मराठी चित्रपटाने देखील आपल्या मनावर गारुड घातलं आहे. काही चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. ‘श्यामची आई’ या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट. चैतन्य तम्हाणे लिखित व त्यांनी निर्देशित केलेला ‘कोर्ट’ चित्रपट ओस्कर च्या निवड यादीत होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले मराठी चित्रपट
आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये ‘सैराट’ ने १०० कोटींहून अधिक कमाई करत विक्रम रचला होता. कोर्ट , फँड्री , द डिसायपल , हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि किल्ला या चित्रपटांनी जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार आणि टीकाकारांची दाद मिळवली होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले प्रमुख मराठी चित्रपट:
सैराट : जगभरात १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट, जो विषमतेवर प्रहार करतो.
कोर्ट : या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवासह अनेक जागतिक पुरस्कार जिंकले आणि ऑस्करसाठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून पाठवला गेला होता.
द डिसायपल : चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित या चित्रपटाला व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ पुरस्कार मिळाला होता.
फँड्री : नागराज मंजुळे यांचा हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक भाष्य करण्यासाठी गाजला होता. त्यातील शालू आणि जब्या हे पात्र आजही लक्षात आहेत.
हरिश्चंद्राची फॅक्टरी ऑस्करसाठी नामांकन मिळालेला पहिला मराठी चित्रपट.
किल्ला : बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने विशेष पुरस्कार जिंकला.
नटसम्राट : या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली.नाना पाटेकर, विक्रम गोखले,मेधाताई मांजरेकर प्रमुख भूमीकेत दिसले होते.
मराठी प्रेषक हा जाणकार आहे. खरा रसिक आहे. त्याला कलेची ऊत्तम जाण आहे. कलेची कदर आहे.
मराठी ही ज्ञानभाषा आहे. मराठी ही समृद्ध भाषा आहे. आणि जर ठामपणे विश्वास ठेवून अभ्यास करत राहिलात तर तीच भाषा तुम्हांला रोजीरोटी पण देते. भाकरीची तजवीज पण करते. मराठी व्यक्ती भूषण गगराणी मराठी भाषेत UPSC ची परीक्षा देऊन भारतात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. भारतातील सर्वात कठीण परीक्षा ते मराठी भाषेत परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले हे कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे. मराठी ही सुंदर, समृद्ध भाषा आहे.काळानुसार मराठीने अनेक भाषेतील शब्दाचा स्वीकार देखील केला आहे. मराठी ही जगात 10 व्या नंबरवर बोलली जाणारी आहे.चीनी मॅनडेरिन ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.मराठी कोश वाङ्मय चा विचार केल्यास जगात तिचा तिसरा क्रमांक लागतो. आणि भारतात दुसरा. खरं तर प्रत्येक राष्ट्राचे एक राष्ट्रगीत असतं. पण मराठी भाषेत लिहलेले ‘पसायदान’ हे विश्वगीत आहे..
आपली भाषा ही विश्वगीताची भाषा आहे.मराठी भाषा आणि मराठी मन हे सुंदर समर्पण आहे.एवढे बोलून मी माझे मनोगत संपवितो
जय हिंद! जय महाराष्ट्र!
—- प्रा. पी. डी. कसबे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम