पीएमपी चालक-वाहक ठरले देवदूत, हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाचे वाचविले प्राण

रात्रीची ९ ची वेळ… बसमध्ये जेमतेम १२ प्रवासी. त्यातील एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका येतो. मदतीसाठी जवळपास कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नसते आणि हाती तेवढा वेळही नसतो, अशा वेळेस पीएमपीचालक बसलाच रुग्णवाहिका करतो, तर बसचा वाहक प्रथमोपचार करत प्रवाशाला दवाखान्यात पोहोचवतो. योग्यवेळी उपचार भेटल्याने प्रवाशाचे प्राण वाचले जातात. जीवनदान देणारे चालक आणि वाहक त्या प्रवाशासाठी देवदूतच ठरतात.

 

या देवदुतांचे नाव आहे वाहक सुनिल दिलीप कर्चे आणि चालक बालाजी गायकवाड दोघेही फुरसुंगीतील भेकराईनगर येथील पीएमपी आगारात इलेक्ट्रिक बसवरील चालक आणि वाहक म्हणून काम करत आहेत. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ते भेकराईनगर ते आळंदी या मार्गावरील बसवर कर्त्यव्यावर होते. रात्री ९ वाजता गाडी आळंदीकडे मार्गस्थ झाली. पूलगेट येथे गाडी आल्यानंतर एका प्रवाशाच्या छातीत जास्त दुखू लागले. वाहक सुनिल कर्चे यांनी ही बाब चालकास सांगितली.

 

गाडी थांबवून प्रवाशाची अवस्था पाहिली, मात्र त्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक दिसत होते. रुग्णवाहिका बोलावण्याइतपत वेळ हाती नसल्याने प्रसंगावधान साधून दोघांनीही त्वरित निर्णय घेतला. वाहकाला त्याचे हातपाय आणि छाती चोळायला सांगून प्रथमोपचार करत बालाजीने गाडी तातडीने ससून रुग्णालयाकडे वळवली. नागरिकांनी रस्ता द्यावा यासाठी बालाजीने एक हात सातत्याने हॉर्नवर ठेऊन त्वरित ससून रुग्णालय गाठले. प्रवाशाला दवाखान्यात दाखल करून डॉक्टरांना उपचार करण्यास सांगितले. योग्य वेळेत उपचार मिळणे शक्य झाल्याने प्रवाशाचे प्राण वाचले. बालाजी आणि सुनील या दोघांनी दाखविलेली तत्परता आणि त्वरित घेतलेल्या योग्य निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. भेकराईनगर आगाराचे व्यवस्थापक सुरेंद्र दांगट आणि इतर कर्मचाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र लोकशाही व्हॉट्सअँप ग्रुपला खालील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/CrRDTcPYRLY3d6QtdEOTKI

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.