आर्यन खान ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची एंट्री; समीर वानखेडे फडणवीस कनेक्शन उघड

0

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी कार्डिलिया क्रुझवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. आणि क्षणात ही ब्रेकिंग जगभर पोहचली. मात्र काही दिवसानंतर आर्यन खान ड्रग्स प्रकरणात झालेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली, आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सुरुवातीपासूनच हे प्रकरण फर्जिवडा असल्याचं सांगत होते. त्याचबरोबर ही कारवाई करणारा माणूस समीर वानखेडे देखील फेक असल्याचे ते सातत्याने बोलत होते. मात्र ते राजकारणाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या आरोपाला फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. परंतु या प्रकरणाचा स्वतंत्र असणारा साक्षीदार प्रभाकर साईलने काही धक्कादायक खुलासा केल्याने हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडलं.

माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरून आर्यन खानच्या हाताला पकडून पळवत नेणारा किरण गोसावी हा एनसीबीचा कोणताही अधिकारी नसल्याचं समोर आलं. शिवाय कार्डिलिया क्रुझवर छापा पडण्यापूर्वीच सकाळी समीर वानखेडेंच्या कार्यालयात किरण गोसावी गेला असल्याचंही उघड झालं. एवढंच नाही तर पंचवीस कोटी रुपयांचा बॉम्ब टाकल्याची,आणि १८ कोटींवर ही डिल करण्याची भाषा किरण गोसावी आणि सॅम डिसूजा यांच्यामध्ये झाली होती, असा खुलासा प्रभाकर साईल याने एफिडेविट मार्फत केला. तर यातले आठ कोटी समीर वानखेडे यांना द्यायचे आहेत असंही त्यांनी सांगितलं. आणि आर्यन खान प्रकरणाने वेगळेच वळण घेतलं

प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक करत असलेल्या आरोपांना देखील महत्त्व आल्याचे पाहायला मिळालं. यानंतर नवाब मलिक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. नवाब मलिक यांनी आज एक पत्रकार परिषद घेत समीर वानखडे, निरज गुंडे, आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कनेक्‍शन माध्यमांना सांगताना अनेक गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माझ्या मुलाची चौकशी करा असं सांगणारा, निरज गुंडे हा चोर माणूस आहे. तो देवेंद्र फडणवीस यांचा दलाल असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणीस यांचे नाव घेतले नाही. मात्र नीरज गुंडे मागील सरकारचा दलाल म्हणून काम करत होता, शिवाय तो वर्षा बंगल्यावर सतत फेर्‍या मारायचा, असं नवाब मलिक म्हणाले. याचा अर्थ ते थेट देवेंद्र फडणवीसांना म्हणत होते, हे कोणीही सांगू शकेल.

मी जेव्हापासून समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहे, तेव्हापासून निरज गुंडे हा समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन काय करतो? याचं नेमकं काय कनेक्शन आहे? शिवाय हा कोणाच्या सांगण्यावरून जातोय? असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचे या पत्रकार परिषदेत दिसून आले. तो माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येत असायचा, हा वर्षा बंगल्यावर चकरा मारायचा. तरीदेखील याला कोणी काही बोलत नव्हतं. याचा अर्थ त्याचा आणि माजी मुख्यमंत्री यांचे खुप कनेक्शन असल्याचे उघड होतं. असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

पाठीमागच्या सरकार सोबत कनेक्शन असणाऱा निरज गुंडे, आतादेखील समीर वानखेडे यांना गुपचूप भेटत आहे. माजी मुख्यमंत्र्यांचा दलाल राहिलेला हा निरज मुंडे तो स्वतः भेटतोय का कोणाच्या सांगण्यावरून असं काम करतोय? याचा गौप्यस्फोट मी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा घणाघात देखील नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

माझ्यावर हे लोक भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, मात्र पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मी यांचा संबंध कोणाकोणाशी आहे? या प्रकरणाशी यांचा संबंध काय आहे? हे मी महाराष्ट्राला दाखवणार असून, हिवाळी अधिवेशनानंतर भाजपच्या नेतेमंडळींना महाराष्ट्रात फिरायला तोंड राहणार नाही. त्यांचे तोंड काळ होणार असल्याचा घणाघात, नवाब मलिक यांनी केला असून, येणारं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजण्याची शक्यता दिसून येत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.