पुण्यात चक्क आईच्या कुशीतून एका वर्षाच्या चिमुकल्या बाळाचे अपहरण
पुण्यामध्ये गुन्हेगारांना काही कमी नाही. दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. पुण्यातील हडपसर येथे आठवड्यात चार महिन्याच बाळ चोरून नेल्याची घटना घडली होती. मात्र त्या बाळाला एका दिवसातच सुखरूप पोलिसांनी आईच्या ताब्यात दिले होते. ही घटना घडून काही दिवस होत नाहीत तोपर्यंत अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. हडपसर पुलाखाली आईच्या कुशीत एक वर्षाचे बाळ झोपले होते. तेवढ्यातच त्या ठिकाणी दोन महिला आल्या व त्या बाळाचे अपहरण केले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
चोरून नेलेल्या बाळाचे नाव कार्तिक काळे असे आहे. या बाळाचे वय एक वर्ष आहे. या प्रकरणी बाळाची आई शर्मिला निलेश काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हडपसर या ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली असलेल्या बीआरटी रोडच्या रिकाम्या जागेमध्ये मागील काही दिवसापासून शर्मिला काळे आणि त्यांचा एक वर्षाचा चिमुकला कार्तिक राहत होता. परंतु सकाळी शर्मिला यांना एक वर्षाचा चिमुकला कार्तिक आसपास कुठेच दिसला नाही. ही गोष्ट लक्षात येताच, त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र कार्तिक सापडला नाही.
ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता. त्या फुटेजमध्ये दोन महिला एका बाळाला सोलापूर रोडच्या दिशेने घेऊन जात असल्याचे पहावयास मिळाले. या प्रकरणी अज्ञतांवर हडपसर पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी विशेष पथक देखील तपास करत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम